चाकण : दोन वर्षांपूर्वी राज्य सरकारने प्लॅस्टिक बंदी जाहीर केली. त्याप्रमाणे चाकण नगर परिषदने कडक अंमलबजावणी करत शहरात प्लॅस्टिक बंदी केली होती. शहरातील अनेक मोठ्या व्यापाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली होती. यामुळे छोट्या व्यावसायिकांनीही प्लॅस्टिक पिशव्यांचा वापर बंद केला होता. परंतु गेल्या काही दिवसांपासून नगर परिषदचे दुर्लक्ष होत असल्याने शहरात प्लॅस्टिक पिशव्यांचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे.
चाकण शहरात प्लॅस्टिकबंदीच्या काळात नगर परिषद प्रशासनाने कडक अंमलबजावणी करून अनेक छोट्या-मोठ्या व्यापाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली होती. तसेच शहरातील आठवडे बाजारात जनजागृती करून प्लॅस्टिक पिशव्या न वापरण्याचे आवाहन केल्याने सर्वच स्तरावरील व्यावसायिकांनी प्लॅस्टिक पिशव्यांचा वापर बंद केला होता. परंतु हा कारवाईचा बागुलबुवा फुटला असून पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणावर प्लॅस्टिक पिशव्यांचा वापर सुरू झाला आहे. या प्लॅस्टिक कॅरिबॅग बाजारात येतात कशा हे प्रशासनाला दिसत नाही का? असा सवाल नागरिक करत आहेत. प्लॅस्टिकमुळे पर्यावरणाचा ऱ्हास होत आहे. १०० वर्षे तरी प्लॅस्टिक कुजत नाही. प्लॅस्टिक जाळल्यास पर्यावरणाला धोका निर्माण होऊन प्रदूषण वाढत आहे. तसेच कचऱ्यात जास्त कचरा प्लॅस्टिक कॅरिबॅगच जास्त प्रमाणात असतात. यामुळे कचरा पेटवल्यास त्यातून निघणाऱ्या धुरातून परिसरात हवा प्रदूषण होऊन नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होत आहे. तरी बाजारात येणाऱ्या या पिशव्या रोखणे आवश्यक आहे. प्लॅस्टिक कॅरिबॅग तयार करणाऱ्या कंपन्यांवर कडक कारवाई करणे आवश्यक आहे. ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लॅस्टिकच्या पिशव्या बंदी आहे.
नगर परिषद प्रशासनाकडून प्लॅस्टिक विक्रेत्यांवर कारवाई होते नसल्याने कमी मायक्रॉनच्या प्लॅस्टिक पिशव्यांचा वापर भाजी मंडई, फळ, मिठाई आणि फूलविक्रेत्यांकडून वापर वाढला आहे. तसेच समारंभामध्येही जेवणावळी व कार्यक्रमांमध्ये प्लॅस्टिक द्रोण,ग्लास, कप, वाट्या, चमच्यांचा वापर केला जात आहेत. त्यामुळे सर्वच पातळ्यांवर प्लॅस्टिकबंदीचा फज्जा उडालेला असताना संबधित यंत्रणा डोळेझाक करत आहे. प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे पर्यावरणसह मानवी आरोग्याला हा फटका बसत आहे. राज्य सरकारने कायदे व नियम बनविले असले तरी याची अंमलबजावणी होताना दिसत नाही.
कोट
कोरोनाच्या काळात याकडे दुर्लक्ष झाले होते. परंतु पुन्हा एकदा शहरातील प्लॅस्टिक कॅरिबॅग विकणाऱ्या होलसेल व्यापाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येणार आहे. लोकांनीही प्लॅस्टिक पिशव्यांचा वापर टाळून आपले शहर स्वच्छ व सुंदर ठेवण्यासाठी मदत करावी. प्लॅस्टिकमुक्त चाकण शहरासाठी सर्वांनी एकत्र येऊन प्रयत्न करण्याची गरज आहे. - नानासाहेब कामठे,मुख्याधिकारी, चाकण नगरपरिषद.
प्लॅस्टिकच्या वाढत्या भस्मासुराचा परिणाम.
पावसाळ्य़ात गटारे तुंबतात.
- जनावरांच्या पोटात प्लॅस्टिक गेल्याने त्यांचे आरोग्य धोक्यात येते.
- नाले तुंबतात, पूरस्थिती निर्माण होते.
- प्लॅस्टिकचे विघटन होत नसल्याने भूप्रदषणात वाढ.
* काय उपाययोजना कराव्यात...
- हॉटेल, फेरीवाले, हातगाडय़ा आणि दुकानविक्रेत्यांवर फौजदारी कारवाई करावी.
- प्लॅस्टिक वापरणारे विक्रेत्यांचा परवाना रद्द करवा.
- प्लॅस्टिक पिशव्यांऐवजी तागाच्या, कापडाच्या व कागदाच्या पिशव्यांचा वापर वाढावा.
- प्लॅस्टिक न वापरण्याबाबत जनजागृती करावी.
- प्लॅस्टिक मुक्त परिसर अभियान राबविणे.
-