मंचर : राज्य सरकारने दुधाचा हमीभाव २७ रुपये लिटर जाहीर केला असतानाही खासगी व सहकारी दूध संस्थांनी बाजारभाव कमी केले आहेत. दुधाचे बाजारभाव लिटरला २० ते २२ रुपयांपर्यंत खाली आल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे. उत्पादन खर्च मोठ्या प्रमाणात वाढतोय; मात्र दुधातून काहीच हाती लागत नसल्याने दूध उत्पादकांचे आर्थिक बजेट कोलमडले आहे. दि. १ जून २०१७ रोजी शेतकऱ्यांनी राज्यव्यापी संप केला होता. शेतमाल व दूध बाजारात न पाठविल्याने कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले होते. आंदोलनाची दखल राज्य शासनाला घ्यावी लागली. त्या वेळी दुग्धविकासमंत्री महादेव जानकर यांनी दुधाचा हमीभाव ३.५ फॅट व ८.५ एसएनएफ दुधाला हमीभाव २४ रुपयांवरून २७ रुपये करण्याचे जाहीर केले. प्रति ३.५ फॅटच्या पुढे प्रतिपॉर्इंट ३० पैसे भाव जाहीर केला. त्या वेळी दूध उत्पादक शेतकऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. सरकारचा निर्णय जाहीर होताच खासगी दूध संस्थांनी सुरुवातीस दर कमी करण्यास सुरुवात केली. त्यानंतर सरकारी दूध संस्थांचे दर कमी झाले. सध्या दुधाचा भाव २० ते २२ रुपये असा असून लिटरमागे ५ ते ७ रुपयांनी दर कमी झाले आहेत. १ डिसेंबरपासून पॅकिंगव्यतिरिक्त लागणारे जादा दूध आम्ही खरेदी करणार नाही, अशी धमकी सर्व सहकारी संघांनी एकत्रित येऊन राज्य सरकारला दिल्यामुळे दुधाचे दर कमी करण्याबाबत पुनर्विचार करू, असे आश्वासन दुग्धविकासमंत्र्यांनी सहकारी संघांना दिले. त्यामुळे सहकारी संघानेदेखील दुधाचे दर खाली आणले आहेत. त्यामुळे राज्य सरकारने दूधदरवाढीची केलेली घोषणा फसवी ठरली आहे, अशी प्रतिक्रिया दूधउत्पादक शेतकरी देत आहेत. सरकारचे दुग्धव्यवसायावर नियंत्रण नाही. त्यामुळे दूधउत्पादक शेतकरी भरडला जातोय. दुधाचा वाढलेला उत्पादन खर्च पाहता गाईच्या दुधाला किमान ३५ रुपये दर हवा, तर म्हशीच्या दुधाला ५५ रुपये दर मिळाल्यास शेतकऱ्याला परवडेल. लिटरमागे ३० ते ३२ रुपये खर्च येतो.
सरकारने ठरवलेल्या दुधाच्या हमीभावाला खासगी संस्थांचा हरताळ; शेतकरी अडचणीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 11, 2018 1:44 PM
राज्य सरकारने दुधाचा हमीभाव २७ रुपये लिटर जाहीर केला असतानाही खासगी व सहकारी दूध संस्थांनी बाजारभाव कमी केले आहेत. दुधाचे बाजारभाव लिटरला २० ते २२ रुपयांपर्यंत खाली आल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे.
ठळक मुद्देसरकारचा निर्णय जाहीर होताच खासगी दूध संस्थांनी सुरुवातीस दर कमी करण्यास केली सुरुवातसध्या दुधाचा भाव २० ते २२ रुपये असा असून लिटरमागे ५ ते ७ रुपयांनी दर कमी