पुणे: पुण्यात कोरोनाची गंभीर परिस्थिती निर्माण झाली असताना ससूनमध्ये प्रशासनाने बेड वाढवण्याचा निर्णय घेतला होता.मात्र या निर्णयाला विरोध दर्शवित व पुरेशा मनुष्यबळासह काही मागण्यांसाठी ससूनमधील निवासी प्रशिक्षणार्थी डॉक्टर संघटना असलेल्या मार्डने काम बंद ठेवत संप पुकारला होता. मात्र प्रशासनासोबत झालेल्या बैठकीनंतर निवासी डॉक्टरांनी संप सोमवारी (दि.१९) संध्याकाळपर्यंत स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे.
पुण्यात निवासी डॉक्टरांची शनिवारी संध्याकाळी प्रशासनासोबत बैठक झाली.त्यात आम्हाला आमच्या मागण्यांबाबत लिखित स्वरूपात आश्वासन दिल्याची माहिती 'मार्ड 'ने प्रसिद्ध पत्रकाद्वारे दिली आहे.
प्रशासनाने ससून मधील कोरोना रुग्णांच्या बेड्स मध्ये कुठलीही वाढ करणार नसल्याचे सांगितले आहे. तसेच कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी ६० वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या भरतीसाठी प्रयत्न करणार आहे. त्यामुळे सोमवारी(दि.१९) संध्याकाळपर्यंत संप मागे घेत असल्याची माहिती पत्रकात दिली आहे.
कालच पालकमंत्री अजित पवार यांनी ससूनमधले बेड वाढवणार नाही. अस जाहीर केलं होतं. पण आमच्यापर्यंत हा निर्णय लेखी पोहोचत नाही तोपर्यंत आम्ही केवळ क्रिटिकल सेवा पुरवू. असे डॉक्टरांच म्हणणं आहे. तसेच डॉक्टरांच्या काही मागण्यांकडेही प्रशासन दुर्लक्ष करत असल्याने त्यांनी बारा तासाच्या आत मागण्या पूर्ण झाल्या नाहीत. त्याचे पडसाद महाराष्ट्रातील प्रत्येक वैद्यकीय महाविद्यालयात उमटतील असा इशारा प्रशासनाला दिला आहे.
सध्या ससूनमध्ये ५५० कोरोना आणि ४५० इतर रुग्ण आहेत. मात्र निवासी डॉक्टरांची संख्या केवळ ४५० आहे. आणखी ३०० बेड वाढवले तर १०० डॉक्टरांची गरज भासणार आहे. आम्ही सर्वसामान्य जनतेच्या सेवेसाठीच आहोत. रुग्णसेवा अविरत चालू आहे. गेल्या एक दीड महिन्यापासून आमच्या काही मागण्या प्रलंबित आहेत. प्रशासन त्याकडे जाणूनबुजून दुर्लक्ष करत आहे. डॉक्टरांच्या सर्व अडचणी आणि त्यावरील उपायही आम्ही प्रशासनाला सुचवून दिले आहेत. पण ते याची दखल घेत नाहीत. असेही त्यांनी सांगितले आहे.