पुणे : शहरात मंगळवारी रात्री साडेसात वाजता अचानक आलेल्या जोरदार पावसामुळे पुणेकरांना अक्षरशः झोडपून काढले. आजही सकाळनंतर पावसाला जोरदार सुरुवात झाली आहे त्यामुलुइ नागरिकांची चांगलीच धांदल उडाल्याचे दिसून आले. कालही पावसाचा जोर इतका होता की, काही क्षणांमध्ये रस्त्यांवर पाणीचपाणी झाले. या पावसाने गणपतीचे देखावे पाहण्यासाठी आलेल्यांची दाणदाण झाली. क्युम्युलोनिंम्बस प्रकारच्या ढगांमुळे हा पाऊस झाल्याचे हवामानशास्त्र खात्याने सांगितले. इतका जोरदार पाऊस यंदाच्या हंगामात पहिल्यांदाच पाहायला मिळाला. आतापर्यंत हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळाला होता.
दोन-तीन दिवस पावसाचा अंदाज
सध्या राज्यभर मान्सून सक्रिय आहे. त्यामुळे विदर्भ, मराठवाडा, कोकण आणि मध्य महाराष्ट्रात पावसाचा अंदाज आहे. येत्या दोन-तीन दिवसांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी कोसळतील, असा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने दिला आहे.
रस्त्यांवर पाणीच पाणी
पाऊस एवढा जोरदार होता की, काही मिनिटांमध्ये रस्त्यांवर ठिकठिकाणी पाणी साठले. या पावसाने वाहतूक कोंडीत भर पडली. काल भूतबंगला चौकामध्ये झाड पडल्याची घटना घडली.
...म्हणून होतो जोरदार पाऊस
पुणे शहराच्या आकाशात स्थानिक पातळीवरील वातावरणामुळे ‘क्युम्यूलोनिंम्बस’ प्रकारचे ढग तयार झाले होते. हे ढग आकाशात उभे वाढत जात असतात. साधारणपणे एक ते दोन किलोमीटर उंच असे हे ढग असतात. त्यामुळे एकदम त्या ढगांमधील पाणी जमिनीवर आले की, जोरदार पाऊस होतो. कमी वेळेत अधिक पाऊस होतो. गेल्या वर्षीदेखील सप्टेंबर महिन्यात अशाच प्रकारचा पाऊस झाला होता.
''पुण्याच्या आकाशात ‘क्युम्यूलोनिंम्बस’ प्रकारचे ढग निर्माण होत आहेत. त्यामुळे विजांच्या कडकडाटासह रात्री जोरदार पाऊस झाला. सप्टेंबर महिन्यामध्ये अशा प्रकारचा पाऊस होणे हे साहजिक आहे. - अनुपम कश्यपी, प्रमुख, भारतीय हवामानशास्त्र विभाग, पुणे''