पुणे : सध्या महाराष्ट्र कोरोनाच्या संकटातून जात आहे. कणखर महाराष्ट्राने आम्हाला नेहमीच लढायला शिकवलंय. आज सामान्यांसह सर्वपक्षीय लोकांनी एकत्रित येऊन लढण्याची गरज आहे. मात्र, राज्यात चित्र नेमकं उलट दिसत आहे. महाराष्ट्र संकटाच्या वेळी देशाच्या मदतीला धावून गेला आहे. परंतु, आज वैश्विक महामारीच्या संकटात अनेक राज्यांसह महाराष्ट्र सापडला असताना केंद्र महाराष्ट्राबाबत दुजाभाव करतंय. राज्याचं राजकारण नासलंय. महाराष्ट्राने चिंतन करण्याची गरज आहे. १ मे हा दिवस चिंतन दिन म्हणून साजरा करायला हवा, अशी अपेक्षा सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातील मान्यवरांनी व्यक्त केली.
१ मे हा महाराष्ट्र राज्याचा स्थापना दिवस. याच दिवशी १९६० साली तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांच्या हस्ते स्वतंत्र महाराष्ट्र राज्याची मुहूर्तमेढ रोवली गेली. पंडितजींनी यशवंतराव चव्हाण यांच्या हाती महाराष्ट्राचा मंगलकलश दिला आणि नव्या महाराष्ट्राच्या नेतृत्वाची जबाबदारी सोपविली. उद्या (दि. १) महाराष्ट्र एकसष्टी साजरी करणार आहे. या पाश्र्र्वभूमीवर आज महाराष्ट्र कोणत्या
उंबरठ्यावर आहे. राज्याने काय मिळवलं आणि काय गमावलं याविषयी संयुक्त महाराष्ट्र लढा जवळून अनुभवलेल्या मान्यवरांशी ‘लोकमत’ने संवाद साधला.
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------
कोरोनाच्या संकटामुळे आपण गतवर्षी आणि यंदाही महाराष्ट्र दिन साजरा करू शकत नाहीये. हे केवळ राज्यावरचे नव्हे तर जगावरचे संकट आहे. १ मे हा महाराष्ट्र दिनाबरोबरच कामगार दिन देखील आहे. आपण स्थापनेवेळी जाहीर संकल्प केला की इथे लोकशाही समाजवादाची पहाट नव्याने उगवेल. हे राज्य शेतकरी कामगारांचे होईल, पण आज शेतकरी आणि कामगारांची स्थिती काय? आहोत हे पाहातच आहोत. कोरोनाने आज सर्वांनाच जायबंदी केलंय.. राज्य कोरोनाग्रस्त, सरकार त्रस्त, पण विरोधी पक्ष पाहिला तर राजकारण नासलंय असंच म्हणावं लागेल. अशा या काळातही आम्हाला संयुक्त महाराष्ट्र निर्मितीची आठवण येते आणि उमेद येते. महाराष्ट्राने आम्हाला लढायला शिकवंलय... महाराष्ट्राने १ मे हा दिवस चिंतन दिन म्हणून साजरा करावा. आम्ही ठरवलं काय? होतं नि झालं काय? महाराष्ट्राने चिंतन करण्याची गरज आहे. मायमराठीच्या नावाने राज्य स्थापन केले. पण मराठीच्या राज्यात मुले इंग्रजी शिकत आहेत आणि मराठीचा दुस्वास करीत आहेत. कला, साहित्य सर्वच पातळीवर हे चिंतन व्हायला हवं आहे. आजचे राजकारण पाहिले तर किळस येण्यासारखी स्थिती आहे.आमचे राज्यकर्ते काय? वागतायत याचं त्यांना भान नाहीये. पुढचं संकट बिकट आहे. कष्टक-यांच्या हाताला दाम आणि काम नाही अशी परिस्थिती आहे. . आमच्या हातूनच कोरोना काळात सर्व काढून घेतलं जातंय. समाजातील जाणकार मंडळींनी आणीबाणीच्या विरोधात जशी एकी दाखवली तशीच दाखवण्याची गरज आहे. ही आणीबाणीपेक्षा गंभीर स्थिती आहे. याचं भान मराठी बांधवांनी आणि भारतीयांनी बाळगण्याची गरज आहे. नव्या उमेदीने उभे राहाण्याची गरज आहे. महाराष्ट्राला माझा शतश: प्रणाम
-बाबा आढाव, ज्येष्ठ कामगार नेते
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------
गेल्या साठ वर्षात मागे वळून बघताना असे वाटते की आज विदर्भ आणि मराठवाडयाचे पश्चिम महाराष्ट्रातील लोकांशी चांगले संबंध प्रस्थापित झाले आहेत. तरीही अजूनही प्रादेशिक असमतोल आहे. सध्याच्या काळात सरकारने सर्वच संस्थांचे केंद्रीकरण करण्यास सुरूवात केली आहे. एका बाजूला जिल्हा परिषद, पंचायत समित्यांना अधिकार दिले आहेत. असे कायदे झाले. पण प्रत्यक्षात पैसे. कामांना मंजुरी आणि कर्मचा-यांच्या बदल्या करण्याचे अधिकार हे सरकारने स्वत:कडे ठेवले. .राजकीय शक्ती आपल्या हातात ठेवल्यामुळे सामान्यांचे नुकसान झाले आहे. आज छोटी छोटी कामे करण्यासाठी मुंबई गाठावी लागत आहे. जे खूप वाईट झाले आहे. धनंजय गाडगीळांनी 1965 मध्ये असे सुचविले होते की मुंबईतील कारखाने अविकसित भागात न्या. त्यासाठी वाहतुकीला सबसिडी देखील द्या. मुंबईची गर्दी, ताणतणाव हे सगळे प्रश्न हाताबाहेर चालले आहेत. मुंबई, पुणे नाशिक या त्रिकोणामुळे दाटी वाढली आहे. यामुळे पोलिसांवरचा खर्च वाढला आहे. ग्रामीण भागापेक्षा दुप्पट खर्च शहराच्या पोलिसिंगवर येतो आहे. आरोग्याच्या सोयीसुविधा शहरापेक्षा ग्रामीण भागात कमी आहेत. ग्रामीण जनतेवर अन्याय होत आहे. शेतीमध्ये आपण स्वावलंबी झालो आहोत. ही समाधानाची बाब आहे. साठ वर्षात समतोल वाढ व्हायला हवी होती ती झालेली नाही. वाहतूक, उद्योगधंदे, राजकारण यांचे विकेंद्रीकरण व्हायला हवं आहे. - सामाजिक चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्ते पन्नालाल सुराणा,
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------
1960 मध्ये संयुक्त महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली. तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते प्रतापगडावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण झाले. ग.त्र्यं माडखोलकरांनी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांना विचारले होते की हा महाराष्ट्र मराठी होणार की मराठा होणार. तेव्हा चव्हाण यांनी हा महाराष्ट्र मराठी होणार असं म्हटलं होतं. जो जो मराठी बोलतो, महाराष्ट्रावर प्रेम करतो तो मराठी. महाराष्ट्र संकटाच्या वेळी देशाच्या मदतीला धावून गेला आहे. मग ते 1962 चे चिनी आक्रमण असो. यशवंतरावांचं वाक्य आहे की ज्यावेळी हिमालय संकटात सापडेल तेव्हा महाराष्ट्राच्या सह्याद्रीचा काळा पत्थर छातीचा कोट करून हिमालयाचे रक्षण करेल. ही महाराष्ट्राची परंपरा नेहमीच जपली गेली आहे. मात्र आज खेदाने म्हणावेसे वाटते की, वैश्विक महामारीच्या संकटात अनेक राज्यांसह महाराष्ट्र सापडला असताना केंद्र महाराष्ट्राबाबत दुजाभाव करतंय की काय अशी मनात शंका येत आहे. हे मनाला अत्यंत क्लेशकारी आहे. तरीही महाराष्ट्राने देशाचं आणि लोकशाहीचे भान ठेवून काम सुरू ठेवलं आहे हा आशेचा किरण आहे. तीन पक्ष समन्वयाने सरकार चालवित आहेत. देशाच्या सर्व लोकांनी परिस्थितीचे भान ठेवावे. लोकशाहीत स्वयंशिस्त आणि लोकसहभाग आवश्यक आहे. तो कायम राखला जावा हीच अपेक्षा आहे- उल्हास पवार, कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते
-----------------------------------