पुणे : वेताळ टेकडी ही पुणेकरांचे ग्रीन हेरिटेज आहे. त्याला धक्का लावू नका. आज हजारो पुणेकर वेताळ टेकडीच्या संरक्षणासाठी एकत्र आले आहेत, उद्या लाखो येतील. म्हणून महापालिकेने टेकडीवरील सर्व प्रस्ताव रद्द करावेत, अशी मागणी टेकडीप्रेमींनी रविवारी (दि.१ मे) सकाळी केली.
पुणे महापालिका वेताळ टेकडीमधून दोन बोगदे, दोन रस्ते तयार करणार आहेत. त्यासाठी टेकडीला फोडणार आहेत. त्यामुळे टेकडीची जैवविविधता नष्ट होईल. तसेच भूजलावरही परिणाम होणार असल्याने नागरिक व पर्यावरणप्रेमींनी या प्रकल्पाला जोरदार विरोध केला आहे. त्यासाठी निषेध म्हणून १ मे रोजी सकाळी साडेसात वाजता वेताळ टेकडीवर आपला मारुती मंदिरासमोर निषेध अभियान राबविण्यात आले. हजारो पुणेकर सहभागी झाले होते.
पालिकेच्या वतीने टेकडी फोडण्यासाठी तीन प्रकल्प प्रस्तावित आहेत. टेकडीवरील हिरवाई नष्ट होऊ नये म्हणून पर्यावरणप्रेमी प्रयत्न करत आहेत. बालभारती ते पौड फाटा रोड, एचसीएमटीआर मार्ग व दोन बोगदे असे तीन प्रकल्प या टेकडीवर होणार आहेत. सध्या हवामान बदलाचे परिणाम पुणेकरांना भोगावे लागत आहेत. तापमानात वाढ होत आहे आणि तरी देखील टेकडीला फोडून महापालिका प्रकल्प पुढे ढकलत आहे. त्याला पुणेकरांनी विरोध केलाच पाहिजे, असे आवाहन पर्यावरणप्रेमींनी केले आहे.
या संस्थांचा प्रकल्पांना विरोध
ग्रीन पुणे मूव्हमेंट, डेक्कन जिमखाना परिसर समिती, पाषाण एरिया सभा, औंध विकास मंडळ, पंचवती उत्कर्ष सेवा संस्था, बाणेर पाषाण लिंक रोड विकास समिती, असोसिएशन ऑफ नगर रोड सिटिझन फोरम, सेव्ह पुणे ट्रॅफिक मूव्हमेंट, परिवर्तन, मिशन ग्राउंड वॉटर, वसुंधरा स्वच्छता अभियान, देवनदी स्वच्छता अभियान, रामनदी स्वच्छता अभियान, ५१ ए ग्रुप, जीवितनदी, परिसर, कल्पवृक्ष, वॉरिअरर्स मॉम्स, आनंदवन फाउंडेशन यांनी प्रकल्पाला विरोध केला आहे.
सार्वजनिक वाहतूक सक्षम करा
वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी हे प्रकल्प असल्याचे पालिका म्हणते आहे. पण या प्रकल्पांमुळे कोंडीवर काहीच फरक पडणार नाही, त्यामुळे सार्वजनिक वाहतूक सक्षम केली, तरच त्यातून मार्ग निघेल, असे पर्यावरणप्रेमी पुष्कर कुलकर्णी, तुषार श्रोते, रवी सिन्हा, वैशाली पाटकर यांनी सांगितले.
काय आहे प्रकल्प ?
कर्वे रस्ता आणि विधी महाविद्यालय रस्त्यावरील वाहतूक कोंडी कमी व्हावी, यासाठी पौड रस्त्यावरून थेट सेनापती बापट रस्त्यावर बालभारतीपर्यंतचा रस्ता विकास आराखड्यात प्रस्तावित आहे. कोथरूड येथून औंधकडे जाणाऱ्या वाहनचालकांना मोठा हेलपाटा मारावा लागतो म्हणून हा रस्ता होणार आहे. या रस्त्यासाठी वेताळ टेकडी फोडणार आहेत.
''वेताळ टेकडी हिरवाईचा मोठा परिसर आहे. पुणेकरांचे हे ग्रीन लंग्ज आहे. त्यामुळे ही हिरवी फुफ्फुसे जपली पाहिजेत. जर टेकडी फोडली तर टेकडीखालील पाण्याचे नैसर्गिक स्त्रोत नष्ट होतील. पावसाचे पाणी जिरवण्याचे काम टेकडी करते. पाणी झिरपून भुजल पातळी टेकडी वाढवते. म्हणून टेकडी वाचविणे गरजेचे आहे. ही टेकडी ग्रीन हेरिटेज आहे, तिला जपायलाच हवे असे डेक्कन जिमखाना परिसर समितीच्या सुमीता काळे यांनी सांगितले.''