पुणे : यंदा उशिरा का होईना पावसाचे रविवारी पुण्यात आगमन झाले आहे. ‘तो’ आला असून, आता गतवर्षीप्रमाणे पूरस्थितीचा फटका पुणेकरांना बसण्याची शक्यता नाकारता येणार नाही. शनिवारी झालेल्या पावसाने अनेक ठिकाणी वाहतूक काेंडी दिसून आली, तर अनेक भागांतील रस्त्यावर पाण्याचे डाेह साचल्याने नागरिकांचे हाल झाले आहेत. त्यामुळे पावसाळीपूर्व कामाचा दर्जा उघड हाेत असून, आता ‘तो’ आल्याने पुणेकरांवर ‘भय इथले संपत नाही,’ असेच म्हणण्याची वेळ येत आहे. आता ‘तो’ अधिकृतपणे रविवारी दाखल झाल्याने पुणेकरांना सतर्क राहावे लागणार आहे.
मान्सून सक्रिय झाला आणि पुण्यात पुन्हा पाऊस आला आहे. पुण्याची लोकसंख्या प्रचंड वाढत असूनही त्यांची तहान भागविण्यासाठी ते शेती आणि उद्योगांसाठी लागणाऱ्या पाण्याचे नियोजन व्हावे, म्हणून त्याने पुण्यात आगमन केले आहे. शनिवारी दुपारनंतर काही वेळच पाऊस आला आणि शहरात ठिकठिकाणी वाहतूक कोंडी झाली. रस्त्यांवर पाणी साचल्याने नागरिकांना त्याचा त्रास सहन करावा लागला.
पावसामुळे ‘स्मार्ट’ पणाचे इमले भुईसपाट
गतवर्षी जंगली महाराज रस्ता, डेक्कन, पुणे स्टेशन, दांडेकर पूल आदी ठिकाणी पाणी साचून तेथील नागरिकांचे हाल बेहाल झाले होते. एकीकडे स्मार्ट सिटीच्या नावाने गाजावाजा होत असताना दुसरीकडे दरवर्षी पाऊस मात्र या ‘स्मार्ट’पणाचे ‘इमले’ उद्ध्वस्त करत आहे. शहरात बांधकाम वाढले, सिमेंटीकरणावर अधिक भर दिला आहे. परिणामी पावसाच्या पाण्याला मुरायला, नदीकडे जायला जागाच उरली नाही. त्यामुळे अनेक ठिकाणी हे पाणी एकत्र येऊन पूरस्थितीचा सामना करावा लागत आहे.
कमी वेळेत अधिक पावसाचा अंदाज
यंदा तर हवामानतज्ज्ञांनी कमी वेळेत अधिक पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. त्यामुळे पुणेकरांनी आणि महापालिका प्रशासनाने अधिक सतर्क राहण्याची गरज आहे. ढगफुटीसारखा पाऊस झाल्यास अनेक घरांमध्ये, रस्त्यांवर पाणी साचणार आहे. त्यात जनजीवन विस्कळीत होऊ शकते.
मेट्राेचे काम अन् वाहतुकीचा खाेळंबा
मेट्रोचे काम अनेक रस्त्यांवर सुरू आहे. सिंहगड रस्ता, पौड रस्ता, संचेती चौक तसेच इतर रस्त्यांची कामे सुरू आहेत. त्यामुळे देखील पावसामुळे रस्त्यांवर पाणी साचत आहे. शनिवारी झालेल्या पावसामुळे चंदननगर, पौड रस्ता आदी ठिकाणी त्याचा अनुभव पुणेकरांना आला आहे.
गतवर्षी इथे साचले हाेते पाणी...
- बालगंधर्व चौक (झाशीची राणी लक्ष्मीबाई चौक)
- फर्ग्युसन महाविद्यालय रस्ता (गोपाळ कृष्ण गोखले रस्ता)
- जंगली महाराज रस्ता
- डेक्कन (संभाजी पुलाजवळ)
- महापालिकेच्या मुख्य इमारतीसमोर
- कॅम्प परिसरात काही ठिकाणी
- वनाझ मेट्रो स्टेशनजवळ
- सिंहगड रस्त्यावर- राजाराम पूल
- सेव्हन लव्हज चौक
- के. के. मार्केट, धनकवडी
१२१ जागांवर साचतेय पाणी
गेल्या काही वर्षांमधील पावसाचे वाईट अनुभव पाहता यंदा महापालिकेने आपत्कालीन सज्जता दाखविली आहे. तरी ती पावसापुढे तोकडी पडू शकते. कारण शहरात २०१९ पासून सुमारे ३५० ठिकाणी पाणी साचण्याच्या जागा आहेत. या जागा महापालिकेनेच शोधल्या आहेत. त्यातील काही जागांवर त्यांनी उपाययोजना केल्या आहेत. ही ठिकाणे असताना दरवर्षी नवीन ठिकाणी पाणी साचत आहे. महापालिकेच्या आपत्कालीन विभागाने यंदा १२१ जागा शोधल्या आहेत.
येथे साधा संपर्क
महापालिकेने पूर नियंत्रण, आपत्ती व्यवस्थापन कक्ष स्थापन केलेले आहेत. नागरिकांनी कुठे काही अडचण, आपत्ती, पूरस्थिती आली तर पुढील क्रमांकावर संपर्क साधावा. (०२०) २५५०१२६९, २५५०६८००/१/२/३/४.
यंदा कमी वेळेत अधिक पाऊस येणार आहे. गेल्या काही दिवसांमध्ये पुण्यात त्याचा अनुभव आला आहे. पुणे शहरात पाऊस पडण्याचे तीन विभाग आहेत. खडकवासला-शिवाजीनगर-पाषाण परिसरात अधिक पाऊस, वडगावशेरी, कोरेगाव पार्क, नगर रस्ता इथे मध्यम पाऊस आणि वाघोली-लोणीकाळभोर इथे कमी पावसाचा भाग आहे.
- डॉ. रामचंद्र साबळे, हवामानतज्ज्ञ