Pune Lok Sabha Result 2024:पुण्यात मोहोळांचा दमदार विजय; धंगेकर पराभूत, जाणून घ्या पराजयाची कारणे...
By ऑनलाइन लोकमत | Published: June 5, 2024 03:03 PM2024-06-05T15:03:16+5:302024-06-05T15:03:47+5:30
पुणे लोकसभेत लाखांपेक्षा जास्त मताधिक्य घेत मोहोळ यांनी सहज विजय मिळवला
पुणे: शहर लोकसभा मतदारसंघात महायुतीचे भारतीय जनता पक्षाचे उमेदवार माजी महापौर मुरलीधर मोहोळ (Murlidhar Mohol) यांनी एकहाती बाजी मारली. त्यांना ५ लाख ८४ हजार ५८६ मते मिळाली. कसबा विधानसभेच्या पोटनिवडणुकीतील विजयाने चर्चेत आलेले आमदार रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) त्यांचे प्रतिस्पर्धी होते. त्यांनी लढत देण्याचा प्रयत्न केला, मात्र नेत्यांमधील गटबाजीने तो अयशस्वी ठरला. त्यांना ४ लाख ६१ हजार ४१९ मते मिळाली. धंगेकर पराभूत होण्यामागे आणि मोहोळ यांच्या विजयामागची प्रमुख कारणे समोर आली आहेत.
विधानसभेच्या ६ मतदारसंघांपैकी कॅन्टोन्मेट वगळता कसबा, पर्वती, वडगाव शेरी, कोथरूड आणि शिवाजीनगर अशा ५ मतदारसंघात मोहोळ यांनी मताधिक्य मिळवले. त्यांच्या हक्काच्या कोथरूड मतदारसंघातच त्यांना ७५ हजार मतांपेक्षा जास्त मताधिक्य मिळवले. ते मोडणे धंगेकर यांना अवघड गेले. लाखांपेक्षा जास्त मताधिक्य घेत मोहोळ यांनी सहज विजय मिळवला. भाजपचा पुणे शहर लोकसभा मतदारसंघातील हा सलग तिसरा विजय आहे. यापूर्वी अनिल शिरोळे, गिरीश बापट व आता मोहोळ असे वेगवेगळे उमेदवार होते; मात्र भाजपला यावेळी मताधिक्य घटण्याचा धक्का बसला आहे.
पुण्याच्या विकासासाठीच मी माझ्या खासदारकीचा उपयोग करणार
लाेकसभा निवडणुकीतील विजय माझ्याबरोबरच महायुतीच्या प्रत्येक कार्यकर्त्याचा आहे. प्रचारादरम्यान माझ्यावर वैयक्तिक आरोप झाले. मी त्याला प्रत्युत्तर दिले नाही. माझ्या पक्षाची शिकवण तशी नाही. प्रचारात आपण काय काम केले, आपल्या पक्षाने काय काम केले ते सांगावे, असे माझे मत आहे. त्याप्रमाणे मी पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच देवेंद्र फडणवीस यांच्या कामांविषयी बोलत होतो. पुण्याच्या विकासासाठीच मी माझ्या खासदारकीचा उपयोग करणार आहे. - मुरलीधर मोहोळ, खासदार
पुण्यातील जय-पराजयाची कारणे काय?
मुरलीधर मोहोळ यांचा विजय कशामुळे?
- शहर भाजपची ताकद
- राष्ट्रवादी, शिवसेनेचा पाठिंबा
- आश्वासक चेहरा
- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा
- वंचित, एमआयएमचा प्रभाव कमी हाेणे.
रवींद्र धंगेकरांचा पराभव का झाला?
- काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजी
- हक्काच्या कसबा मतदारसंघातही अपेक्षित मते न मिळणे
- मतदानाच्या दिवशी अपुरी पडलेली काँग्रेसची यंत्रणा
- रवींद्र धंगेकर यांना अतिआत्मविश्वास
- मित्रपक्षांची अपेक्षित ताकद न मिळणे.