पुणे : पूरग्रस्त भागातील शासकीय इमारती, शाळा, समाज मंदिर, पूल आदींचे स्ट्रक्चरल आॅडिट करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. शाळा सुरू होण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू असल्याची माहिती विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी दिली. पूरग्रस्तांनी धोकादायक घरात अजिबात राहू नये, त्यांच्या निवाऱ्याची व्यवस्था प्रशासनातर्फे केली जाईल, अशा सूचनाही त्यांनी दिल्या आहेत.
डॉ. म्हैसेकर यांनी सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील पूरग्रस्त भागाचा दोन दिवसांचा दौरा केला. या दौ-यात त्यांनी विविध पूरग्रस्त गावांना भेटी देऊन तेथील नागरिकांशी संवाद साधला. पुनर्वसन शिबिरांमध्ये भेट देऊन पूरग्रस्तांना दिलासा देत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. याबाबत म्हैसेकर म्हणाले, निधीची अजिबात कमतरता भासणार नाही. योग्य पद्धतीने मदत व पूनर्वसन होण्यासाठी विभागीय स्तरावर सुसूत्रता ठेवण्यात येईल. आता पाणी व वीज पुरवठ्याचा महत्वाचा प्रश्न आहे. त्यानंतर जीवनावश्यक वस्तूंची गरज भागवावी लागेल.
या बाबी पुरवण्याच्या दृष्टीने सर्वच पातळीवर प्रयत्न सुरू आहेत. रोगराई व साथीच्या रोगाला प्रतिबंध घालण्यासाठीवैद्यकीय पथक काम करीत आहे. फॉगिंग मशीन, पोर्टेबल जेटींग मशीन, टीसीएल पावडर, डस्टींग पावडरचा साठा मुबलक प्रमाणात उपलब्ध करून देण्यात आला आहे. विद्यार्थ्यांना शालेय साहित्य उपलब्ध करून देण्यात येणार आहे. दोन्ही बाधित जिल्ह्यातील शेतीचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्याचेही पंचनामे करण्याचे काम सुरू असल्याचे म्हैसेकर यांनी सांगितले.
स्वयंसेवी संस्थांची बैठक २१ रोजीसांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील पूरग्रस्तांना मदतीसाठी विभागीय कार्यालयाने स्वयंसेवी संस्था, दानशूर व्यक्तींची बैठक दि. १९ आॅगस्ट रोजी बोलविली होती. ती आता दि. २१ आॅगस्ट रोजी सकाळी ११ वाजता विभागीय कार्यालयात आयोजित केली आहे.