लोकमत न्यूज नेटवर्ककुरकुंभ : जयश्री भागवत यांचा सरपंचपदासाठी होत असलेला संघर्ष आता थांबला असून, त्यांच्या बाजूने असणाऱ्या ग्रामपंचायत सदस्य राहुल भंडलकर यांचे सदस्यत्व परत त्यांना मिळणार असल्यामुळे परत एकदा संख्याबळ भागवत यांच्याकडे झुकले आहे. त्यामुळे विरोधकांच्या अपेक्षांना खीळ बसली असून, त्यामुळे पुढील काळासाठी सरपंच म्हणून त्यांच्या अडचणी कमी झालेल्या दिसत आहेत.भागवत यांच्या समर्थनातील ग्रामपंचायत सदस्य राहुल भंडलकर यांना तिसरे अपत्य झाल्याचा आरोप करीत सोमनाथ गायकवाड यांनी अप्पर जिल्हाधिकारी यांच्याकडे अर्ज करीत त्यांचे सदस्यत्व रद्द केले होते. मात्र भंडलकर यांनीदेखील पुढील अपील करीत अप्पर आयुक्त यांच्याकडे पुरावे सादर केले. सदस्यत्व परत मिळवले. त्यामुळे या प्रकरणातील सुनावणीने सरपंच भागवत यांना दिलासा दिला आहे.दरम्यान, या काळात झालेल्या घडामोडीत सरपंच भागवत यांचे सरपंचपद राहणार की नही याबाबत संभ्रम निर्माण झाला होता. मात्र वरील निर्णयाने त्यांच्या विरोधात होणाऱ्या हालचाली तूर्तास तरी थांबल्या आहेत. कुरकुंभ येथील राजकीय वर्तुळातील चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे.कुरकुंभच्या राजकीय कारकिर्दीतील अतिशय गोंधळाची परिस्थिती या पंचवार्षिक कालावधीत पाहावयास मिळाली. वॉर्ड क्रमांक ४ मधील झालेली दुबार निवडणूक, त्यासाठी झालेला न्यायालयीन लढा, सरपंचाच्या विरोधातील अविश्वास ठराव व इतर विविध कारणाने या पंचवार्षिक काळातील वातावरण ढवळून निघाले. त्यातच राहुल भंडलकर यांच्या तिसऱ्या अपत्याचे प्रकरण, त्यामुळे सरपंच बदलाच्या अनेक घटना या काळात पाहावयास मिळाल्या. मात्र या सर्वांतून काहीच निष्पन्न झाले नाही. परिणामी फक्त विविध घडामोडी, आरोप-प्रत्यारोपाचे राजकारणाने राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे.या बाबत अर्जदार सोमनाथ गायकवाड यांना संपर्क करण्याचा प्रयत्न करण्यात आला, मात्र त्यांची प्रतिक्रिया कळू शकली नाही.
कुरकुंभ सरपंचपदाचा संघर्ष थांबला
By admin | Published: June 23, 2017 4:37 AM