जनसंघर्ष यात्रेच्या मार्गावरून संघर्ष; काँग्रेसमध्ये संघर्ष यात्रेवरून गटबाजी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2018 02:57 AM2018-08-21T02:57:40+5:302018-08-21T06:51:19+5:30
प्रदेश काँग्रेसच्या वतीने काढण्यात येणाऱ्या जनसंघर्ष यात्रेचा पुण्यातील मार्ग ठरवण्यावरूनच प्रदेशच्या नेत्यांसमोरच दोन पदाधिकाºयांनी या मतभेदांचे दर्शन घडवले.
पुणे : महापालिकेतील नगरसेवकांची संख्या २५ वरून थेट ९ पर्यंत आली, तरीही काँग्रेसमधील मतभेद व पदाधिकाऱ्यांचे एकमेकांवर कुरघोडी करण्याचे प्रयत्न काही संपायला तयार नाहीत. प्रदेश काँग्रेसच्या वतीने काढण्यात येणाऱ्या जनसंघर्ष यात्रेचा पुण्यातील मार्ग ठरवण्यावरूनच प्रदेशच्या नेत्यांसमोरच दोन पदाधिकाºयांनी या मतभेदांचे दर्शन घडवले.
राज्य सरकारच्या विरोधात ३१ आॅगस्टला पश्चिम महाराष्ट्रातून काढण्यात येणाºया जनसंघर्ष यात्रेचे नियोजन करण्यासाठी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण व ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण असे दोन माजी मुख्यमंत्री शनिवारी पुण्यात आले होते. त्यांनी काँग्रेस भवनामध्ये सकाळी पश्चिम महाराष्ट्रातून आलेल्या पदाधिकाºयांची बैठक घेतली. कोल्हापूर, सांगली, सातारा असा प्रवास करीत ही यात्रा पुण्यात ६ सप्टेंबरला रात्री येईल. पुण्यातच ७ किंवा ८ सप्टेंबरला बीजे मेडिकल ग्राऊंडवर यात्रेचा समारोप करणार आहे. या दोन मार्गांवरून मतभेद निर्माण झाले. नेत्यांसमोरच वादावादी सुरू झाली.
राजीव गांधी ई-लर्निंग स्कूलचे वावडे का आहे, असा सवाल एका नेत्याने केला व राहुल गांधी आले होते त्याही वेळी त्यांना तिथे येण्यापासून थांबवण्यात आले, अशी आठवणही दिली. यावर दुसºया नेत्याने यात्रा लांबून कशाला न्यायची, असा सवाल केला. लक्ष्मीनगरमधून नेली तर चांगले होईल, असा दावा केला. लक्ष्मीनगरचा रस्ता चिंचोळा आहे, त्यापेक्षा मोठ्या रस्त्याने नेल्यास अडचण होणार नाही, असा युक्तिवाद त्यावर करण्यात आला. अखेरीस चव्हाण यांनीच ‘नंतर पाहू’ म्हणत त्यात मध्यस्थी केली. आता या मतदारसंघातील यात्रेचा नक्की मार्ग कोठून जाणार, याबाबत राजकीय औत्सुक्य निर्माण झाले आहे.
मार्ग निश्चित : मात्र, लांबचे कारण देत बदलला
यात्रेचा मुक्काम असल्यामुळे पुण्यातील प्रमुख रस्त्यांवरून यात्रा न्यावी, अशी सूचना चव्हाण यांनी केली. त्यावर सर्वच विधानसभा मतदारसंघांत यात्रा न्यावी, असा निर्णय झाला. यासाठी मार्ग निश्चित करण्यात आले. पर्वती मतदारसंघातून यात्रा कशी न्यायची, यावर दोन नेत्यांमध्ये मतभेद झाले. गंगाधाम चौकातून ती सुरू होईल, शिवदर्शन येथील राजीव गांधी ई-लर्निंग स्कूलमार्गे दांडेकर पुलावर येईल, असे ठरले. हा मार्ग लांबचा होईल, असे म्हणत एका नेत्याने यात्रा लक्ष्मीनगरमधून दांडेकर पुलाकडे नेण्यास सुचविले.