वडगाव मावळ : शेवटचा दिवस गोड व्हावा अशी प्रत्येकाची इच्छा असते. परंतु, ही शेवटचा विसावा घेण्याच्या इच्छेसाठी सुध्दा अतोनात संघर्ष केला जातोय.. मावळ परिसरात काही गावात स्मशानभूमी नाही तर काही ठिकाणी स्मशानभूमी असेल तरी गॅसशवदाहिनीची व्यवस्था नाही. त्यात भर म्हणजे शासनाने मावळ तालुक्यातील शहरी भागात रॉकेलपुरवठा बंद केला आहे. त्यामुळे गेल्या चार महिन्यांत अनेक ठिकाणी अंत्यविधीला रॉकेलऐवजी डिझेलचा वापर करण्याची वेळ आली आहे. आणि डिझेलचा वापर धोकादायक आहे. परंतु रॉकेल अभावी धोका पत्करण्याची वेळ त्या कुटुंबीयांवर आली.रॉकेलमुक्त करून घरोघरी गॅस ही कल्पना शासनाने अंमलात आणली. त्यामुळे मावळ तालुक्यातील वडगाव, लोणावळा, तळेगाव दाभाडे, या शहरी भागात रॉकेलचा पुरवठा बंद करण्यात आला आहे. यापूर्वी तालुक्यात ८० ते ९० टॅंकरद्वारे तालुक्यात स्वस्त धान्य दुकानदारांमार्फत ग्राहकांना रॉकेलपुरवठा केला जात होता. तो पूर्णपणे बंद झाला आहे. तालुक्यातील संपूर्ण ग्रामीण भागासाठी फक्त बारा हजार लिटर रॉकेलचा पुरवठा ३६ गावांत केला जातो. ग्रामीण भागात अनेक भागांत आजही रॉकेलचा वापर केला जातो. त्यामुळे नागरिकांचे अतोनात हाल होतात. वीस-तीस रुपयांच्या रॉकेलवर गरीब कुटुंब घरातील कामकाज करीत होती. परंतु रॉकेल बंद झाल्याने समस्या निर्माण झाली आहे. आदिवासी भागातील गोरगरीब कुटुंबांसाठी रॉकेलपुरवठा पुन्हा सुरू करावा, अशी मागणी करण्यात येत आहे.
गॅस शवदाहिनीची इमारत धूळ खात वडगाव शहरातील स्मशानभूमीत दहा दिवसांपूर्वी एक अंत्यविधीसाठी संपूर्ण शहरात फिरूनही रॉकेल मिळाले नाही. त्यामुळे गोडेतेल टाकण्यात आले. त्याचा काही परिणाम न झाल्याने डिझेलचा वापर करण्यात आला. डिझेल हे धोकादायक आहे. परंतु रॉकेल अभावी धोका पत्करण्याची वेळ त्या कुटुंबीयांवर आली. वडगाव येथील स्मशानभूमीत गॅसशवदाहिनीची इमारत बांधून तयार आहे. परंतु दोनवर्षांपासून धूळ खात आहे. गॅसशवदाहिनी सुरू करण्याबाबत संबंधित यंत्रणांची उदासिनता असल्याने त्याचा फटका नागरिकांना बसत आहे.