पुणे : ‘सबलीकरणाची प्रक्रिया लक्षात न आलेला मोठा स्त्रीसमूह समाजात आहे. एकीकडे जागे होऊ पाहणाऱ्यांचा गट, तर दुसरीकडे चंगळवादाच्या लाटेमध्ये स्वत:ला हरवलेला समूह आहे. शोषित, हतबलतेने ग्रासलेला स्त्रीवर्ग आहे. जोपर्यंत यांच्यातील दरी मिटणार नाही, तोवर संघर्ष सुरू राहणार आहे. प्रत्येक समाजगटातील स्त्री आत्मनिर्भर आणि सबल होत नाही, तोवर संघर्ष सुरूच राहील,’ असे मत संमेलनाध्यक्षा डॉ. अरुणा ढेरे यांनी व्यक्त केले.विश्वकर्मा पब्लिकेशन्सच्या वतीने अंजली कुलकर्णीलिखित डॉ. नीलम गोºहे यांच्या सामाजिक कर्तृत्वाची संघर्षयात्रा असलेल्या ‘अपराजिता’ या पुस्तकाचे प्रकाशन सोमवारी झाले, त्या वेळी अध्यक्षस्थानावरून डॉ. ढेरे बोलत होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून माजी संमेलनाध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख, महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, विशाल सोनी उपस्थित होते. नीलम गोºहे यांच्यासह लेखिका अंजली कुलकर्णी उपस्थित होत्या. देशमुख म्हणाले, ‘‘पुरुषी मानसिकता, सरकारचे स्त्रीप्रश्नाकडे होणारे दुर्लक्ष यामुळे अद्याप समानता प्रस्थापित झालेली नाही. तरीही स्त्रीला स्वभान देण्यात महिला संघटनांचे महत्त्वाचे काम आहे. नीलम गोºहे यांचे काम उठून दिसते; कारण आपण काहीच काम केलेले नाही.’’नीलम गोºहे म्हणाल्या, ‘‘पुरुषाने बुलेट ट्रेनच्या वेगाने नाही, किमान पॅसेंजरच्या वेगाने बदलावे, अशी अपेक्षा असते. स्त्रीला दमन करण्याचा, ढकलण्याचा कितीही प्रयत्न केला तरी ती नव्या दमाने उभी राहते, म्हणून ती अपराजिता आहे.’’मनोहर सोनवणे यांनी प्रास्ताविक केले. संगीता बोºहाडे यांनी सूत्रसंचालन केले.हिंदू असल्याची लाज वाटत नाही‘सर्व धर्म टाकाऊ आहेत का, याचा मी पुनर्विचार करू लागले आहे. अंधश्रद्धा, कौमार्य चाचणी, जातपंचायत अशा प्रथांना माझा विरोधच आहे. मी प्रबोधनकारी हिंदुत्व मानते, वाईट परंपरांना विरोध करते. मात्र, हिंदू असल्याची मला लाज वाटत नाही,’ असे नीलम गोºहे म्हणाल्या. ‘आरक्षण मिळाले तरी स्त्रियांना त्यांचे प्रश्न सोडवण्याचे किती स्वातंत्र्य मिळाले, प्रश्न सोडवण्याचे तंत्र अवगत झाले का याबाबत मला शंका वाटते. पीसीपीएनडीटीचे अनेक खटले प्रलंबित आहेत. त्यामुळे शिक्षा विरळ झाली आहे. एफ फॉर्मबद्दल अनेक तक्रारी आहेत. या माध्यमातून संघटित गुन्हेगारी वाढत आहे. ती रोखायची असेल तर सामाजिक, राजकीय इच्छाशक्तीची गरज आणि कायद्याची अंमलबजावणी करणारी यंत्रणा आवश्यक आहे,’ असेही त्यांनी नमूद केले.
स्त्री आत्मनिर्भर होईपर्यंत संघर्ष सुरूच राहणार- डॉ. अरुणा ढेरे
By ऑनलाइन लोकमत | Published: January 29, 2019 2:22 AM