लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : राज्य परिवहन महामंडळाने (एसटी) उत्पन्न वाढविण्यासाठी फुकट्या प्रवाशांवर कारवाईचे अभियान सुरू केले आहे. पुणे विभागाच्या सर्वच आगारात मोठ्या प्रमाणात ही मोहीम हाती घेण्यात आली आहे. यासाठी एसटीने विशेष पथक तयार केले असून ते अचानकपणे गाडीतल्या प्रवाशांचे तिकीट तपासात आहेत. गाडी बस्थानकात आल्यानंतर प्रवासी बसमधून उतरत असतानाही तिकीट तपासणी केली जात आहे. फुकटा प्रवासी आढळला तर त्याच्याकडून शंभर रुपये अथवा तिकिटाच्या दुप्पट रक्कम वसूल केली जात आहे. रोज सुमारे ८०० बसची तपासणी होत आहे.
राज्य परिवहन महामंडळाने २२ सप्टेंबर ते १० ऑक्टोबर दरम्यान विशेष तिकीट तपासणी अभियान सुरू केले. राज्यातील सर्वच आगारात ही मोहीम राबविली जात आहे. स्वारगेट, वाकडेवाडीसह अन्य आगार मिळून जवळपास १३ ठिकाणी बस तपासल्या जातात. मात्र, फुकट प्रवास करणाऱ्यांचे प्रमाण खूप कमी आहे. पुणे विभागात रोज जवळपास १ लाख प्रवासी प्रवास करीत आहे. यात अवघे चार ते पाच प्रवासी फुकट प्रवास करताना आढळत आहे. त्यांच्याकडून १०० रुपये किंवा तिकिटाच्या दुप्पट रक्कम दोन्ही पैकी जी जास्त असेल ती रक्कम वसूल केला जात आहे.
बॉक्स १
१३ आगार, १२ पथक
पुणे विभागात १३ आगार असून, यात जवळपास १२ तपासणी पथके कार्यरत आहे. ही पथके भरारी असून ते पुणे विभागात फिरणाऱ्या कोणत्याही एसटीची अचानकपणे तपासणी करून कारवाइ करीत आहे.
बॉक्स २
आतापर्यंत ५ प्रवाशांवर कारवाई
पुणे विभागात एसटीने फुकट प्रवास करणाऱ्यांची संख्या कमी आहे. जवळपास ५ प्रवासी फुकट प्रवास करताना आढळले. त्यांच्याकडून जवळपास दोन ते अडीच हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. ही कारवाई १० ऑक्टोबरपर्यंत चालणार आहे. त्यामुळे प्रवासी व दंडाच्या रकमेत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.
कोट :
आठशे गाड्यांची तपासणी
पुणे विभागात रोज जवळपास ८०० एसटी गाड्या तपासल्या जात आहे. पुणे विभागात फुकट प्रवास करणाऱ्यांची संख्या तशी कमी आहे. जवळपास ५ प्रवाशांवर कारवाई करण्यात आली आहे.
ज्ञानेश्वर रणवरे, विभागीय वाहतूक अधिकारी, एसटी, पुणे विभाग