अनलॉकमध्ये एसटी बससेवा सुरू झाल्यानंतर प्रवाशांचा अपेक्षित प्रतिसाद मिळत नाही. लॉकडाऊनपुर्वीच्या प्रवासी संख्याच्या तुलनेत अद्याप ५० टक्केही प्रवासी मिळत नाहीत. त्यामुळे एसटीकडून राज्यात प्रवाशांना आकर्षिक करण्यासाठी पर्यटन, धार्मिक, ऐतिसाहिक ठिकाणांसाठी विशेष बससेवा सुरू केली जात आहे. त्यानुसार पुण्यातून प्रत्येक रविवारी रायगड दर्शन, लोणावळा दर्शन, अष्टविनायक दर्शन, गाणगापुर दर्शन तर बारामती येथून कोकण दर्शन या सेवा सुरू केल्या आहेत.
ख्रिसमस व नवीन वर्षाच्या पार्श्वभुमीवर आलेल्या सलग सुट्टयांमुळे एसटीने शुक्रवारपासून सलग चार दिवसांसाठी ही सेवा दिली आहे. सर्वसामान्य नागरिकांना परवडणारे तिकीट दर व एका दिवसाचाच प्रवास असल्याने सर्व गाड्यांना प्रवाशांचा उत्स्फुर्त प्रतिसाद मिळत आहे. सर्व गाड्यांचे आरक्षण ‘फुल्ल’ होत आहे. अन्य मार्गांवर धावणाऱ्या जादा गाड्यांना मात्र ५० ते ६० टक्क्यांपर्यंत प्रतिसाद मिळत आहे.
रेल्वेने दिवाळी व छटपुजेच्या पार्श्वभुमीवर सुरू केलेल्या बहुतेक उत्सव विशेष गाड्यांना मुदतवाढ दिली पण याला फार प्रतिसाद मिळताना दिसत नाही. बहुतेक गाड्यांचे आरक्षण सहज उपलब्ध आहे. बहुतेक उत्सव विशेष गाड्या अन्य राज्यांत जाणाऱ्या आहेत. काही गाड्यांचे ३० ते ४० टक्क्यांपासून ७० टक्क्यांपर्यंत आरक्षण होत आहे. ही स्थिती नवीन वर्षाच्या सुरूवातीलाही कायम राहण्याची शक्यता आहे.
चौकट
“दिवाळीच्या तुलनेत सध्या मिळणारा प्रतिसाद कमी आहे. या स्थितीत पुढेही फार बदल होणार नाही. कोरोनाच्या अनुषंगाने प्रवाशांनी दक्षता घ्यावी.”
- मनोज झंवर, जनसंपर्क अधिकारी, पुणे विभाग, मध्य रेल्वे
चौकट
“सर्व दर्शन गाड्या ‘फुल्ल’ होत आहेत. अपेक्षेप्रमाणे प्रतिसाद मिळत असल्याने महाबळेश्वरसह अन्य ठिकाणी गाड्या वाढवाव्या लागत आहेत. इतर गाड्यांनाही प्रतिसाद वाढतो आहे.”
- ज्ञानेश्वर रणवरे, वाहतुक अधिकारी, एसटी महामंडळ, पुणे
------------------