मंचर: एसटी बसचे स्टेरिंग फेल झाल्याने बस रस्ता सोडून खड्ड्यात गेली. सुदैवाने खड्ड्यातील मोठ्या दगडाला एसटी अडल्याने आतील 80 प्रवासी बालमबाल बचावले आहेत. ही घटना पुणे नाशिक महामार्गावर एकलहरे गावचे हद्दीत आज दुपारी घडली आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, पुणे ते लासलगाव ही एस टी बस क्रमांक हि पुणे नाशिक महामार्गावरून नाशिकच्या दिशेने निघाली होती. चालक निवृत्ती रामभाऊ हांडगे हे नारायणगावच्या दिशेने जात होते. पावसामुळे रस्ता ओला झाला होता. त्यातच एकलहरे गावाजवळून एस टी बस जात असताना चालक निवृत्ती रामभाऊ हांडगे यांना स्टेरिंग फेल झाल्याचे लक्षात आले. त्यांनी प्रसंगावधान राखत एस टी बसवर कसेबसे नियंत्रण मिळविले. यादरम्यान एसटी बस रस्ता सोडून खड्ड्यात गेली. मात्र तिथे एका मोठ्या दगडाला बस अडल्याने मोठी दुर्घटना टळली आहे. त्यामुळे एसटीतील जवळपास ७५ ते ८० प्रवाशांचे प्राण वाचविले. बस चालक निवृत्ती रामभाऊ हांडगे आणि कंडक्टर एस. एस. सानप यांनी बसमधील प्रवाशांना पुणे ते कोपरगाव व इतर बस गाडीतून बसून पुढील प्रवासासाठी रवाना केले. काही प्रवाशांना डोक्याला, हाताला साधारण मुका मार लागला आहे. मात्र इतर प्रवासी सुखरूप आहेत. प्रवाशांनी इतर बस मध्ये बसल्यानंतर सुटकेचा निश्वास टाकला.