इंदापूर : इंदापूर शहरातील अंबिकानगर येथील विवाहित महिलेचा छळ करून ‘माहेरहून पैसे आणावेत व लग्नातील हुंड्याचे सोने कधी आणणार?’ असा तगादा लावल्याने विवाहितेने आत्महत्या केली. या प्रकरणी मृत महिलेचा पती व सासरा यांच्याविरुद्ध इंदापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून, मृताचे वडील ज्ञानदेव वसुदेव गुंड (वय ४८, रा. देवळाली, ता. करमाळा, जि. सोलापूर) यांनी इंदापूर पोलिसात फिर्याद दिली आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सारिका वैभव रोकडे (वय २२) हिचा विवाह दि. २० एप्रिल २०१७ रोजी अंबिकानगर, इंदापूर येथील वैभव दामोदर रोकडे याच्याशी झाला होता. त्यानंतर बुधवारी (दि. १२) दुपारी २ वाजता सदर गुन्ह्यातील आरोपी वैभव दामोदर रोकडे व सासरा दामोदर शिवाजी रोकडे यांना इंदापूर पोलिसांनी अटक करून इंदापूर न्यायालयासमोर हजर केले असता, शुक्रवार (दि. १४) पर्यंत दोन दिवसांची पोलीस कोठडी मिळाली आहे. यामध्ये पोलीस नाईक अमोल खैरे, वीरभद्र मोहोळे यांनी या गुन्ह्यातील काम पाहिले असून, सहायक पोलीस निरीक्षक गणेश लोकरे तपास करीत आहेत.शिवीगाळ व मारहाणलग्नात सासरच्यांनी तिला ३ तोळे सोने केले होते व माहेरहून काहीच सोने दिले नसल्याने सारिका हिला तिचा पती वैभव, सासरा दामोदर शिवाजी रोकडे (रा. अंबिकानगर, इंदापूर) व नणंद राणी बाळासाहेब गायकवाड (रा. अकलूज, ता. माळशिरस, जि. सोलापूर) नेहमीच ‘माहेरहून पैसे व सोने आणण्यासाठी’ शिवीगाळ व मारहाण करीत होते.ती आई-वडिलांना हे सर्व प्रकार वेळोवेळी सांगत असे; मात्र आई-वडील तिची वेळोवेळी समजूत काढून तिला शांत करीत. पण, शनिवारी (दि. ८) दुपारी १.४५ वाजता इंदापूर येथील राहत्या घरी सारिकाने सासरच्या छळाला कंटाळून स्वत:ला जाळून घेतले. तिला उपचारांसाठी सोलापूर येथील सिव्हिल रुग्णालयात दाखल केले असता, तिचा उपचारांदरम्यान मृत्यू झाला. त्यानंतर मृताच्या वडिलांनी इंदापूर पोलीस ठाण्यात मृत महिलेचा पती, सासरा व नणंद यांच्याविरुद्ध कायदेशीर फिर्याद दाखल केली.
आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती व सासऱ्याला केली अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2018 1:55 AM