आंबेठाण : चाकण व नारायणगाव येथून करोडो रुपयांच्या सिगारेटची वाहतूक करणारे मोठे कंटेनर लांबविणारा कुख्यात दरोडेखोर सिद्धार्थ उर्फ सिद्धू रमेश जन्मेजाई (वय ३७, रा. उल्हासनगर, ठाणे) यास स्थानिक गुन्हे शाखा, पुणे ग्रामीण (एलसीबी) यांनी तुर्भेनाका (नवी मुंबई) येथून गुरुवारी (दि. २३) अटक करण्यात आली आहे. या गुन्हेगारावर पुणे जिल्ह्यातील चाकण, नारायणगाव, कल्याण, परतूर, कोतवाली ,ठाणे, संगमनेर आदी पोलीस ठाण्यांसह परराज्यांतही गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. मागील काही महिन्यांपासून सिद्धार्थ जन्मेजाई याच्या मागावर पुणे ग्रामीण पोलीस, रायगड पोलीस, ठाणे पोलीस, एटीएस मुंबई पोलीस होते.
मागील महिन्यात रासे गावच्या हद्दीत रात्रीच्या वेळी एका काळ्या रंगाच्या स्कॉर्पिओतून आलेल्या अज्ञात चोरट्यांनी शिक्रापूर येथील एका कंपनीतून सिगारेट घेऊन जाणारा ट्रक अडवून ८ कोटी रुपये किमतीचे ब्रिस्टॉलचे सिगारेटचे बॉक्स ट्रकसह पोबार केल्याचा प्रकार घडला होता. यामागे कुख्यात दरोडेखोर जन्मेजाई हाच असल्याचे निष्पन्न झाले आहे; तसेच नारायणगाव हद्दीतील नाशिक महामार्गावर सुमारे १० लाख रुपये किमतीचा कंटेनर व त्यामधील कोट्यवधी रुपये किमतीचे एकूण ६६५ सिगारेटचे महागडे बॉक्स दरोडा टाकून लंपास केले होते. त्याबाबत नारायणगाव पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल होता. संबंधित गुन्ह्यातील आरोपींनी नारायणगाव येथून लंपास केलेल्या कंटेनरमधील चोरीचा माल टिटवाळा पोलीस स्टेशन हद्दीत दुसऱ्या कंटेनरमध्ये भरत असताना पेट्रोलिंग करणाºया टिटवाळा पोलिसांनी तीन आरोपींना अटक करण्यात आली होती. परंतु, सिद्धार्थ जन्मेजाई हा या गुन्ह्याचा मुख्य सूत्रधार फरारी होता. त्याचा पुणे ग्रामीणच्या गुन्हे शोध पथकाकडून तपास सुरू होता.
एलसीबीच्या पथकाने गुरुवारी (दि.२३ आॅगस्ट) गुन्ह्यातील संशयित मुख्य सूत्रधार सिद्धार्थ रमेश जन्मेजाई यास स्कोडा कार, दोन सीमकार्ड असणारे मोबाईल फोन यांच्यासह ताब्यात घेतले आहे. त्याने नारायणगाव पोलीस स्टेशन व चाकण पोलीस स्टेशन येथील दोन्ही गुन्हे केले असल्याची कबुली दिली आहे.