पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये शिकत असलेले अनेक विद्यार्थी दररोज ५०० रुपयांचा भत्ता घेऊन विधानसभा निवडणुकीच्या प्रचारामध्ये गुंतले आहेत. मोठ्या संख्येने तरुण आणि उच्चशिक्षित कार्यकर्ते सहज उपलब्ध होत असल्याने राजकीय पक्षांच्या उमेदवारांकडून या विद्यार्थ्यांची मोठी मागणी होत आहे. शहरातील तसेच जिल्ह्यातील उमेदवारांच्या प्रचारासाठी ते कामाला लागले आहेत. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये ५२ विभागांतून हजारो विद्यार्थी शिकत आहेत. त्यातील बहुतांश विद्यार्थी राज्याच्या कानाकोपऱ्यामधून तसेच परराज्यांतूनही शिकायला आहेत. विद्यापीठातील १६ वसतिगृहांमध्ये ते राहतात. एमए, एमकॉम, एमस्सीचे शिक्षण घेत असलेल्या या विद्यार्थ्यांना दररोज ५०० रुपये देऊन राजकीय पक्षांच्या प्रचारासाठी नेले जात आहे. वर्षभराचा शिक्षण व राहण्याचा खर्च १५ दिवसांच्या प्रचारातून निघणार असल्याने विद्यार्थ्यांनी या संधीचा पुरेपूर फायदा उचलण्याचे ठरविले आहे.दिवाळीच्या अगोदर १५ दिवसांमध्ये संपूर्ण निवडणुकीची प्रक्रिया पार पाडण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने घेतला. त्यातच ऐन शेवटच्या क्षणी शिवसेना-भाजप युती व काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी तुटली. त्यामुळे संपूर्ण मतदारसंघ पिंजून काढून जास्तीत जास्त मतदारांपर्यंत पोहोचण्याचे मोठे आव्हान उमेदवारांसमोर उभे राहिले आहे. भेळभत्त्यावर दिवसदिवसभर राबणारे कार्यकर्ते आता दुर्मिळ झाले आहेत. पक्षनिष्ठा मोठ्या प्रमाणात घटून हितसंबंधी राजकारणाचा उदय झाला आहे. त्यामुळे प्रचारासाठी कार्यकर्ते मिळणे अवघड झाले आहे. त्यामुळे पेड कार्यकर्त्यांचा सोपा पर्याय निवडला जात आहे.
विद्यार्थी कार्यकर्त्यांची निवडणूक जोरात
By admin | Published: October 10, 2014 6:20 AM