पुणे : महापोर्टल या वेबसाईडद्वारे मारुंजी येथील अलार्ड कॉलेजमध्ये घेण्यात येणाऱ्या ऑनलाईन परीक्षेसाठी वेळेत लॉगइन न झाल्याने तसेच पेपर सुरू असताना अनेक वेळा लाईट गेल्याने नुकसान झाल्याचा आरोप करीत विद्यार्थ्यांनी परीक्षेवर बहिष्कार घालत महापोर्टल बंद करण्याची मागणी केली. यावेळी विद्यार्थ्यांनी घोषणाबाजीही केली. यामुळे कॉलेज परिसरात काही काळ तणावाचे वातावरण होते. याबाबत माहिती अशी राज्य शासनाच्या वतीने माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या कनिष्ठ लिपिक पदाच्या भरतीसाठी महापोर्टल या वेबसाईडद्वारे मारुंजी येथील अलार्ड कॉलेजमध्ये परिक्षा सेंटर आहे. येथे दोन शिफ्टमध्ये सोमवारी (दि २) ऑनलाईन परीक्षा घेण्यात येत होती सकाळी १० वाजता पहिल्या बॅच मधील दोनशे विद्यार्थ्यांचा पेपर होता मात्र सर्व्हर डाऊन असल्याने प्रत्येक विद्यार्थ्यांना लॉगइन करण्यासाठी खूप वेळ लागत होता. दरम्यान पेपर सुरू असताना अनेक वेळा लाईट गेली, काही कम्प्युटर सुरू होत नव्हते तर काही जणांना कम्प्युटरच शिल्लक नव्हते यामुळे वेळ वाया गेल्याचा आरोप करीत अखेर विद्यार्थ्यांनी परिक्षेवर बहिष्कार घालत वर्ग सोडला. प्रतिक्रिया
महेश इंगोले ( परीक्षार्थी) : केंद्रावर गेल्यापासून गोंधळाला सुरुवात झाली. मॅनेजमेंट अतिशय ढिसाळ होती. काही जणांचे लॉग इन झाले नाहीत तर अनेक कम्प्युटर अचानक बंद पडत होते. हा विद्यार्थ्यांच्या भविष्याचा प्रश्न असून महापरीक्षा पोर्टलबाबत शासनाने पुनर्विचार करणे गरजेचे आहे. योगेश घुगे (परीक्षार्थी) : एकीकडे महापोर्टल या वेबसाईडवर अनेक अडचणी येतात तर ज्या ठिकाणी आमचे परीक्षा सेंटर आहे त्या अलार्ड कॉलेज ऑफ इंजिनिअरींग महाविद्यालय प्रशासनाला परीक्षांचे काही एक गांभीर्य नाही पहिल्या १० मिनिटात आठ वेळा लाईट गेल्याने आमचा वेळ वाया गेल्याने संयम ढळला.रामा यादव (सचिव,अलार्ड कॉलेज) : आमच्याकडे जनरेटरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने एक दोन वेळा लाईट बंद चालू झाली मात्र महापोर्टचे सर्व्हर डाऊन असेल तर आम्ही काहीच करू शकत नाही त्यात आमची काय चूक आहे? महापोर्टल वरील ऑनलाईन परीक्षा बंद करण्याची मागणी कॉलेज आवारात विद्यार्थ्यांनी केली.यशवंत गवारे (वरिष्ठ पोलीस निरीक्षक हिंजवडी) : मी विद्यार्थ्यांची समजूत काढली असून परीक्षा पुढे घेण्याबाबत बोलणी सुरू आहेत.