वाघोली : वाघोली येथील जयवंत शिक्षण मंडळाच्या कॉलेज कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचे भरधाव वेगाच्या गाडीवरील नियंत्रण सुटल्याने सुरक्षा रक्षकाला जोराची धडक दिली. या अपघातात गंभीर जखमी झालेल्या सुरक्षा रक्षकाचा खासगी रग्णालयात उपचार सुरु असताना मृत्यू झाला. विद्यार्थ्याविरोधात लोणीकंद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या अपघातात उत्तम कैलास खंडागळे असे मृत्युमुखी पडलेल्या सुरक्षा रक्षकाचे नाव आहे. तर सौरभ वारघडे असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, इंजिनिअरींगच्या तृतीय वर्षात शिकणाऱ्या वारघडे हा शेवटचा पेपर दिल्यानंतर आपल्या कारने कॉलेज कॅम्पसमधून घरी निघाला होता. यावेळी त्याच्या कारचा वेग प्रचंड होता. त्याचे कारवरील नियंत्रण सुटल्याने त्याने खुर्चीवर बसलेल्या खंडागळे या सुरक्षा रक्षकास जोरात धडक दिली. या धडकेने तो सुरक्षा रक्षक १५ फूट लांब फेकला गेला. या धडकेत लोखंडी खांब खाली कोसळला आणि गाडी बाजूच्या झाडावर जाऊन आदळली. या धडकेत सुरक्षारक्षक गंभीर जखमी झाला. त्याला वाघोली येथील खासगी दवाखान्यात दाखल करण्यात आले होते. मात्र, त्याच्या डोक्याला आणि तोंडाला मार जास्त असल्याने पुढील उपचारासाठी जहागिर येथे दाखल करण्यात आले. पुढील उपचार चालू असताना सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास त्याचा मृत्यू झाला.
वाघोली येथे विद्यार्थ्याच्या भरधाव कारने सुरक्षा रक्षकाला उडवले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2018 7:52 PM
कारवरील नियंत्रण सुटल्याने विद्यार्थ्याने खुर्चीवर बसलेल्या सुरक्षा रक्षकास जोरात धडक दिली.
ठळक मुद्देसुरक्षा रक्षकाचा खासगी रग्णालयात उपचार सुरु असताना मृत्यू