पुणे : व्याजाने १५ हजार रुपये घेतलेले पैसे परत करण्याच्या वादातून झालेल्या झटापटीत कोंढव्यातील एका इमारतीतील ११व्या मजल्यावरून खाली पडून विद्यार्थ्याचा मृत्यू झाला आहे. सागर चिलवेरी (वय २४, रा. सोलापूर) असे त्याचे नाव आहे. सागर हा इंजिनिअरिंगचा विद्यार्थी आहे. या प्रकरणी कोंढवा पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले आहे. त्यांच्यावर खुनाचा संशय व्यक्त करण्यात येत असून ही घटना पहाटे तीन वाजता घडली.याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कोंढवा भागातील खडी मशीन चौकात पूल हौसिंग ही ११ मजली इमारत आहे. चिलवेरी हे या इमारतीत ११व्या मजल्यावर राहात होते. रात्री यांच्याकडे बीडहून काही जण आले होते. चिलवेरीने २ महिन्यांपूर्वी आरोपींकडून व्याजाने १५ हजार रुपये घेतले होते. त्यावेळी त्यांच्या पैशावरून वाद झाला. त्यात संशयित आरोपी व चिलवेरी यांच्या झटापट झाली. त्यात चिलवेरी हे ११ व्या मजल्यावरून खाली कोसळले. त्यातच त्यांचा मृत्यू झाला.चिलेवरी हे खाली पडताना झालेला आवाज ऐकून सोसायटीचा सुरक्षारक्षक तिकडे धावत गेला. त्याने चिलवेरी यांना खाली पडलेले पाहिल्यावर पोलिसांना कळविले. या घटनेची माहिती मिळताच परिमंडळ पाचचे पोलीस उपायुक्त सुहास बावचे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड यांनी घटनास्थळी भेट दिली आहे. सध्या संशयित आरोपींकडे चौकशी करण्यात येत असून सोसायटीच्या सुरक्षारक्षकाची फिर्याद घेण्याचे काम सुरू आहे.
11व्या मजल्यावरून पडून विद्यार्थ्याचा मृत्यू, तिघांना घेतले ताब्यात, खुनाचा संशय
By ऑनलाइन लोकमत | Published: March 10, 2020 10:21 AM