पुणे : देशातील सद्यकालीन राजकीय प्रवाह एका स्थित्यंतरातून जात आहे. विद्यापीठे आणि शिक्षण संस्थांमधील स्थगित असलेल्या विद्यार्थी निवडणुका पुन्हा सुरू झाल्या पाहिजेत. अशा परिस्थितीत राजकीय पटलावरील भावी युवा नेतृत्व घडवण्यासाठी भारतीय छात्र संसद महत्त्वपूर्ण योगदान देऊ शकेल, अशी अपेक्षा केंद्रीय कायदा आणि न्याय राज्यमंत्री प्रा. एस. पी. सिंह बघेल यांनी गुरुवारी येथे व्यक्त केली.
भारतीय छात्र संसद फाउंडेशन, एमआयटी स्कूल ऑफ गव्हर्नमेंट आणि एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी आयोजित बाराव्या छात्र संसदेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. या वेळी इस्त्रोचे माजी अध्यक्ष डॉ. कैलासवादिवू सिवन, पर्यावरण अभ्यासक डॉ. अनिल जोशी, जे. के. उद्योग समूहाचे सीईओ अनंत सिंघानिया व शास्त्रीय गायिका कौशिकी चक्रवर्ती उपस्थित होते. एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. विश्वनाथ दा. कराड, कार्याध्यक्ष राहुल कराड, कुलगुरू डॉ. आर. एम. चिटणीस, एमआयटी शिक्षण संस्था समूहाचे अधिष्ठाता प्रा. शरदद्र दराडे-पाटील, पंडित वसंतराव गाडगीळ व मिटसॉगचे संचालक डॉ. के. गिरीसन हे उपस्थित होते.
के. सिवन म्हणाले, अंतराळ संशोधनातील नव्या शोधांमुळे आता आपल्याला वादळे, नैसर्गिक आपत्ती यांची पूर्वसूचना देणे शक्य होत आहे. सिंघानिया यांनी विद्यार्थ्यांनी नवे मार्ग, नव्या वाटा, नव्या दिशांचा ध्यास घेतला पाहिजे, असे मत व्यक्त केले.
डॉ. जोशी यांनी पर्यावरणाचे संवेदनशील मुद्दे अधोरेखित करण्यासाठी मुंबई ते उत्तराखंड सायकल रॅली काढत असल्याचे स्पष्ट केले. गायिका चक्रवर्ती यांनी पारंपरिक रचना गाऊन संगीत हा शालेय जीवनापासून विद्यार्थ्यांच्या जीवनात अविभाज्य भाग बनावा, अशी अपेक्षा व्यक्त केली.
डॉ. विश्वनाथ कराड यांनी आपल्या विद्यार्थ्यांनी संतपरंपरेतील ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराज यांचे साहित्यविचार जाणून घेतले पाहिजेत अशी अपेक्षा व्यक्त केली. राहुल कराड यांनी राजकारणाची सकारात्मक बाजू समाजासमोर आणण्याचा प्रयत्न केला पाहिजे, असे मत व्यक्त केले. जम्मू काश्मीरची विद्यार्थिनी नंदिता जामवाल, पंजाबचा विद्यार्थी धीरेंद्र सिंह यांनी विद्यार्थ्यांच्या वतीने मनोगत मांडले. प्रा. गौतम बापट यांनी सूत्रसंचालन केले तर डॉ. के. गिरीसन यांनी आभार मानले.