पुणे : मित्रासोबत गप्पा मारत थांबलेल्या विद्यार्थिनीला अश्लील शिवीगाळ करून विनयभंग केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी चतुःश्रुंगी पोलिसांनी दीपक सौदे नावाच्या व्यक्तीवर गुन्हा दाखल केला आहे. याबाबत एका २२ वर्षाच्या विद्यार्थिनीने फिर्याद दिली आहे. ही घटना ३१ डिसेंबर रोजी रात्री पावणेबाराच्या सुमारास सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ रस्त्यावर घडली आहे.
अधिक माहितीनुसार, फिर्यादी तरुणी विद्यापीठात शिक्षण घेत आहे. तिच्या मित्रासोबत येथील ॲल्युमिनी हॉलसमोरील सार्वजनिक रस्त्यावर ३१ डिसेंबरच्या रात्री गप्पा मारत थांबले होते. त्यावेळी सौदे हा तेथे आला. त्याने तरुणीला काही कारण नसताना तू कोणत्या डिपार्टमेंटची आहे, एवढ्या उशिरा काय करता, असे बोलून शिवीगाळ केली. तसेच पोलिसांची गाडी बोलावून आतमध्ये टाकण्याची धमकी देऊन तरुणीच्या मनास लज्जा उत्पन्न होईल, असे वर्तन केले. तरुणीने पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार केली होती. सहायक पोलिस निरीक्षक झरेकर तपास करीत आहेत.