कोरोनामुळे विद्यार्थी घरातच आहेत. त्यामुळे आई-वडील, कुटुंबातील इतर सदस्य यांच्यातील संवाद आणि कानावर पडणाऱ्या चांगल्या-वाईट गोष्टींमुळे त्यांच्या व्यक्तिमत्त्वात काही बदल घडत असतात. सध्या विद्यार्थी घरातच आहेत. त्यामुळे आई-वडिलांचा श्रमविषयक दृष्टिकोण, सांस्कृतिक चालीरीती संबंधीचे त्यांचे धोरण यांबाबत मुलांना काही गोष्टी ज्ञात होत आहेत. परंतु, कोरोनाकाळात कुटुंबातील सदस्यांच्या आजारपणामुळे व ताण-तणावामुळे मुलांच्या मनावर परिणाम खोलवर झाला आहेत. त्याचा निश्चितच विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्वावर परिणाम झाला आहे.
शालेय व महाविद्यालयीन वातावरणाचा विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्वावर फार मोठा प्रभाव पडत असतो. शाळेत गेल्यावर विद्यार्थ्यांना मित्र भेटतात. एक नवीन वातावरण अनुभवायला मिळते. शालेय जीवनात शिस्तीचे व नियमितपणाचे धडे मिळतात. लेखन व वाचनाची गोडी निर्माण होते. वक्तशीरपणा व नियमितपणा यांचे महत्त्व समजते.
शालेय विद्यार्थ्यांवर कोणत्या ना कोणत्या शिक्षकांच्या व्यक्तिमत्त्वाचा प्रभाव पडत असतो. शिक्षक हा विद्यार्थ्यांसाठी आदर्श बनतो. बऱ्याच वेळा शिक्षकाचे व्यक्तिमत्त्व व त्यांच्याकडून दिली जाणारी वागणूक या गोष्टी मुलांच्या व्यक्तिमत्त्वावर परिणाम करतात. एखाद्या शिक्षकाचे व्यक्तिमत्त्व प्रभावी असेल तर शिक्षकाला आदर्श रूप समजून त्याच्यासारखे ज्ञान, बुद्धी व बळ प्राप्त करण्याची इच्छा विद्यार्थ्यांच्या मनात निर्माण होते. एकूणच शिक्षकांच्या व्यक्तिमत्त्वाचे जे गुणदोष मुलांशी घडणाऱ्या त्यांच्या वागणुकीतून प्रकट होतात. त्या सर्व गुणांचा मुलांच्या व्यक्तिमत्त्वावर चांगला-वाईट परिणाम होत असतो. जिव्हाळ्याने शिकवणारा शिक्षक मुलांच्या मनात जिव्हाळा निर्माण करतो, तर चुकीचे किंवा दुष्ट वर्तन करणारा शिक्षक मुलांच्या मनात दृष्ट वर्तनाचे बीजारोपण करतो, असे म्हटले तर चुकीचे ठरणार नाही.
शाळेत विद्यार्थ्यांना मिळणारा मित्रपरिवार त्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासाला कारणीभूत ठरत असतो. विद्यार्थी आपल्या वर्गातील विद्यार्थ्यांची अभ्यासाच्या बाबतीत स्पर्धा करू लागतात. या स्पर्धेत द्वेष, वैरभाव असण्याची शक्यता असते. मात्र, परिश्रम व चिकाटीही वाढीला लागते. अभ्यासाबरोबरच शाळेत खेळताना मित्रांशी येणारे परस्परसंबंध मुलांच्या व्यक्तिमत्त्वावर मोठा प्रभाव पाडत असतात. गेल्या काही महिन्यांपासून विद्यार्थी शालेय वातावरणापासून दूर आहेत. त्यामुळे निश्चितच विद्यार्थ्यांच्या महत्त्व विकासात अडथळा निर्माण झाला आहे.
समाजाचे व्यक्तीवर नियंत्रण असते. रूढी-चालीरीती, परंपरा, सामाजिक नियम आदींचा व्यक्तीच्या जीवनशैलीवर व्यापक प्रभाव पडत असतो. समाजाच्या नियमांचे उल्लंघन करून मनासारखे वागता येत नाही. समाजात राहूनच प्रत्येकाला सामाजिक आदर्शाचा अंगीकार करावा लागतो. समाजात काही लोक प्रस्थापित नियमांना विरोध करणारे असतात, तर काही परंपराप्रिय असतात. व्यक्ती व समाजाच्या या संघर्षामुळे व्यक्तिमत्त्व विकासात अनेक अडचणी निर्माण होतात. परंतु, त्यातून प्रत्येक जण सद्सदविवेकाला अनुसरून या अडचणीवर मात करण्याचा प्रयत्न करतो. त्यातूनच व्यक्तिमत्त्व विकसित होत जाते. त्यामुळे केवळ शालेय विद्यार्थीच नाही तर महाविद्यालयीन विद्यार्थीसुद्धा व्यक्तिमत्त्व विकासाला मुकले आहेत.
शाळेत न गेल्यामुळे विद्यार्थ्यांच्या वाचन, लेखन आणि संभाषण कौशल्यवरही परिणाम झाला आहे. विद्यार्थ्यांची वाचनाची व लेखनाची गती मंदावली आहे. केवळ व्यक्तिमत्त्वच नाही तर इतर कौशल्यही विद्यार्थ्यांना हव्या त्या प्रमाणात कोरोनामुळे आत्मसात करणे अशक्य झाले नाही, असे म्हटले तर चुकीचे ठरणार नाही. त्यामुळे पुढील काळात ही उणीव भरून काढण्यासाठी सर्वांनाच प्रयत्न करावे लागणार आहे.
- राहुल शिंदे