पुणे : इयत्ता 9 वी मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याने फी न भरल्याने त्याला वर्गाबाहेर काढल्याची घटना वारजेतील एका शाळेत घडली. याप्रकरणी संबंधित विद्यार्थ्याच्या पालकांनी शालेय प्रशासनाबाबत तीब्र नाराजी व्यक्त केली आहे. तसेच याबाबत पोलिसांकडे तक्रार करणार असल्याचे सांगितले. विद्यार्थ्याचे पालक एका ठिकाणी नोकरीला असून त्यांना तात्काळ फीचे पैसे जमविणे कठीण गेले. दोन महिन्यांची फी भरणे बाकी असून चेक बाऊन्स झाल्याने वेळेत फी भरणे शक्य झाले नाही असे त्यांनी म्हटले आहे. मात्र यासगळ्याचा मानसिक व शारीरिक त्रास विद्यार्थ्याला सहन करावा लागला आहे. त्या विद्यार्थ्याला मागील तीन दिवसांपासून वर्गातून बाहेर काढले जात असल्याची माहिती पालकांनी दिली. यामुळे वर्गातील इतर मुलांनी देखील त्याची थट्टा करण्यास सुरुवात केल्याचे पालकांनी सांगितले. यासंबंधी शाळेच्या मुख्याध्यापकांना विचारणा केली असता त्यांनी कुठलाच प्रतिसाद दिला नाही. इतकेच नव्हे तर त्यांनी केबिनमध्ये येण्यास मज्जाव केल्याची तक्रार पालकांनी केली. वेळेत फी भरणे गरजेचे असले तरी देखील त्याची शिक्षा विद्यार्थ्यांना अशाप्रकारे देणे कुठले न्यायात बसते? इतर मुलांसमोर अपमान करणे, वर्गाबाहेर काढणे यामुळे मुलांनी रागाच्या भरात स्वता:च्या जीवाचे काही बरे वाईट केले तर त्याला जबाबदार कोण? असा प्रश्न पालकांनी विचारला आहे.
फी न भरल्याने विद्यार्थ्याला काढले वर्गाबाहेर; वारजेतील घटना
By ऑनलाइन लोकमत | Published: January 10, 2020 2:50 PM
विद्यार्थ्याचे पालक एका ठिकाणी नोकरीला असून त्यांना तात्काळ फीचे पैसे जमविणे कठीण गेले.
ठळक मुद्देविद्यार्थ्याला मागील तीन दिवसांपासून वर्गातून बाहेर काढले जात असल्याची माहिती