पुणे : कोर्सची फी भरल्यानंतरही कोर्स अपूर्ण ठेवल्याप्रकरणी ग्राहक मंचाने एका संस्थेला तक्रारदार विद्यार्थ्याला १२ हजार रुपयांची फी परत देण्यात यावी, असा आदेश दिला आहे.कोर्स अपूर्ण ठेवल्याबद्दल संस्थेने तक्रारदाराला १२ हजार रुपये आदेशाच्या तारखेपासून ३० दिवसांच्या आता परत द्यावेत, तक्रारदाराला झालेल्या नुकसानीबद्दल ५ हजार रुपये आणि तक्रार अर्जाचा खर्च म्हणून १ हजार रुपये द्यावेत, असा आदेश अतिरिक्त जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचाचे अध्यक्ष एम. के. वालचाळे आणि सदस्य शुभांगी दुनाखे, एस. के. पाचरणे यांनी दिला आहे़ याप्रकरणी शांताराम सत्यनारायणजी झंवर (रा. ओंकार कॉम्प्लेक्स, उजवी भुसारी कॉलनी, कोथरुड डेपो) यांनी ग्लोबल इंटरप्रायजेस इन्फोटेक सोल्युशन्स (साई कृपाभवन, के.एस.बी. पंप्स कंपनीसमोर, खराळवाडी, पिंपरी) यांच्याविरुद्ध दावा दाखल केला होता. झंवर यांनी स्वत: मंचापुढे आपली बाजू मांडली.झंवर यांना स्टँटर्ड अॅप्लीकेशन अॅड प्रॉडक्टस हा कोर्स करायचा होता. त्यांनी ग्लोबल इंटरप्रायजेस इन्फोटेक सोल्युशन्स यांच्याकडे या कोर्ससाठी १२ हजार रुपये भरुन प्रवेश घेतला. त्यांना कोर्सनंतर नोकरी उपलब्ध होईल, असे सांगण्यात आले होते. मात्र, कॅम्प परिसरातील त्यांचे कार्यालय बंद होणार असून, ते पिंपरी येथे परत सुरु होणार आहे. त्याठिकाणी कोर्स पूर्ण करण्यासाठी यावे लागेल, असे त्यांना सांगण्यात आले. झंवर यांना कोर्स पूर्ण करुन दिला नाही. तसेच त्यांनी भरलेली फी त्यांना परत करण्यात आली नाही. सेवा देताना त्रुटी असल्यामुळे त्यांनी दाखल केलेला अर्ज मागण्यांसह मंजूर करण्यात यावा, अशी मागणी त्यांनी ग्राहक मंचाकडे केली होती.(प्रतिनिधी)मेल पाठवूनही उत्तर नाहीसंस्थेने कोर्सची फी स्वीकारूनसुद्धा झंवर यांचा कोर्स अपूर्ण ठेवला. तसेच, त्यांनी मेल पाठविल्यानंतरही त्यांना फीची रक्कम परत केली नाही. विद्यार्थ्याकडून कोर्सची संपूर्ण फी घेऊन तो कोर्स अपूर्ण ठेवणे, ही विरुद्ध पक्षाची कृतीही सेवेतील त्रुटी ठरते. युक्तिवादा दरम्यान तक्रारदाराने सांगितले की, त्यांना हा कोर्स शिकविण्यासाठी जे शिक्षक होते, त्यांनी संबंधितांची संस्था सोडली त्यामुळे त्यांचा कोर्स पूर्ण होऊ शकला नाही, ही बाब त्यांनी संबंधितांना पाठविलेल्या मेलमध्ये नमूद आहे. त्याला विरुद्ध पक्षाकडून कोणतेही उत्तर देण्यात आलेले नाही. तक्रार अर्जातील नमूदबाबी लक्षात घेऊन मंचाने तक्रार अर्ज मंजूर केला़
विद्यार्थ्यास फी परत द्यावी
By admin | Published: January 13, 2017 3:30 AM