पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वसतीगृह क्रमांक 9 मध्ये रविवारी रात्री काही विद्यार्थ्यांनी दारु पिऊन गाेंधळ घातल्याची घटना समाेर आली आहे. विद्यापीठ प्रशासनाला ही बाब समजताच विद्यार्थ्यांना पाेलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. या प्रकारामुळे पुन्हा एकदा विद्यापीठाच्या वसतीगृहाच्या सुरक्षेचा प्रश्न समारे आला आहे.
रविवारी रात्री उशीरा विद्यापीठाच्या वसतीगृह क्रमांक 9 मध्ये विद्यार्थ्यांनी दारु पिऊन गाेंधळ घातला. ही बाब काही विद्यार्थ्यांनी सुरक्षारक्षकांना तसेच विद्यापीठ प्रशासनाला सांगितली. सुरक्षारक्षकांनी दारु पिणाऱ्या विद्यार्थ्यांना खाेलीचा दरवाजा उघडण्यास सांगितले. विद्यार्थ्यांनी दरवाजा न उघडल्याने त्यांनी खाेलीच्या काचा फाेडून विद्यार्थ्यांची अवस्था पाहिली. त्यानंतर दरवाजा ताेडण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी आतील विद्यार्थ्यांनी दरवाजा उघडला. सुरक्षारक्षकांनी त्या विद्यार्थ्यांना ताब्यात घेऊन त्यांची मेडीकल चाचणी केली. त्यानंतर त्यांना पाेलिसांच्या स्वाधिन करण्यात आले आहे.
दरम्यान विद्यापीठाच्या वसतीगृहामध्ये दारु पिण्याचे प्रकार वारंवार घडत आहेत. यापुर्वी देखील विद्यापीठ प्रशासनाने दारु पिणाऱ्या विद्यार्थ्यांना पकडून त्यांना समज दिली हाेती. परंतु सातत्याने असे प्रकार झाल्याने विद्यापीठाने विद्यार्थ्यांना पाेलिसांच्या हवाली केेले. रात्री उशीरा हा प्रकार घडल्याने वसतीगृहात गाेंधळाचे वातावरण हाेते. सुरक्षारक्षकांनी विद्यार्थ्यांना शांत केले. या प्रकारामुळे वसतीगृहाच्या सुरक्षेचा प्रश्न समाेर आला आहे.
विद्यार्थ्यांवर हाेणार निलंबनाची कारवाई सावित्रीबाई फुले विद्यापीठाच्या होस्टेल क्र. ९ मधील एका खोलीत विद्यार्थी दारू पीत आहे, असा फोन (२२ फेब्रुवारी) रात्री ११ वाजता सुरक्षा विभागाला आला. त्यावरून सुरक्षा विभागाचे कर्मचारी व होस्टेलचे अधिकारी तेथे पोहोचले. त्यांनी संबंधित विद्यार्थ्याला पोलिसांच्या हवाली केले. संबंधित विद्यार्थ्यावर निलंबनाच्या कारवाईची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. तसेच, होस्टेलच्या सुरक्षेचा आढावा घेण्यात येत आहे.- कुलसचिव