पुणे : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (एमपीएससी) एकूण पदांच्या आठ पट उमेदवारांनाच पूर्व परीक्षेतून निवडून मुख्य परीक्षेसाठी पात्र ठरविण्यात येणार असल्याची घोषणा केली आली. त्यामुळे स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांची संधी हिरावून घेतली जाणार आहे. याला विरोध करण्यासाठी मंगळवारी एमपीएससीचा अभ्यास करणाऱ्या सुमारे एक हजाराहून विद्यार्थ्यांनी शनिवारवाडा ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत काळ्या फिती लावून मोर्चा काढला.एमपीएससीतर्फे यापूर्वी घेण्यात आलेल्या पूर्व परीक्षेत अगदी काठावर पास झालेल्या अनेक उमेदवारांना मुख्य परीक्षेत चांगले गुण मिळाले असून, त्यांची प्रथम श्रेणीच्या पदावर नियुक्ती झाली आहे. त्यामुळे मुख्य परीक्षेसाठी अधिकाधिक विद्यार्थ्यांना संधी देणे हे तर्कसुसंगत व उचित आहे. मात्र, एमपीएससीने परीक्षेच्या निकषाबाबत परिपत्रक प्रसिद्ध करून एकास आठ हे प्रमाण मुख्य परीक्षेसाठी उमेदवारांची निवड करताना लागू राहील, असे स्पष्ट केल्याने पुण्यात स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांनी या निर्णयाविरोधात मोर्चा काढला आणि हा निर्णय रद्द करावा, या मागणीचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना दिले.स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणारा प्रफुल्ल सोलंकी म्हणाला, ‘‘एमपीएससीचा निर्णय अन्यायकारक असून, त्यामुळे स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या हजारो विद्यार्थ्यांच्या संधी हिरावून घेतल्या जाणार आहेत. पूर्व परीक्षेतून गुणवत्ता सिद्ध होत नाही. एकास आठ हे प्रमाण ठेवणे संकुचित वृत्तीचे लक्षण आहे. त्यामुळे एमपीएससीने एकास सोळा असे प्रमाण ठेवावे.’’विशाल खिस्ते म्हणाला, ‘‘माझ्यासारखे ग्रामीण भागातील अनेक विद्यार्थी स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करीत आहेत. काही वर्षांपासून महाराष्ट्रात अनेक ठिकाणी दुष्काळ पडत असल्यामुळे शेतकऱ्यांची मुले स्पर्धा परीक्षांकडे वळली आहेत. परंतु, अशा निर्णयामुळे विद्यार्थ्यांच्या भविष्यावर विपरीत परिणाम होईल.’’यूपीएससीसह कर्नाटक, गुजरात या राज्यांनीही मुख्य परीक्षेसाठी विद्यार्थ्यांच्या निवडीच्या प्रमाणात घट केलेली नाही. यूपीएससीप्रमाणेच एमपीएससीने विद्यार्थांचे प्रामण ठरविणे अपेक्षित आहे; परंतु एमपीएससीच्या या निर्णयामुळे विद्यार्थ्यांचे खच्च१करण होणार आहे. विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करण्यास प्रोत्साहन मिळावे, यासाठी मुख्य परीक्षेसाठी अधिकाधिक विद्यार्थ्यांना संधी मिळणे गरजेचे आहे. त्यामुळे हे प्रमाण एकास आठ ठेवू नये.- डॉ. आनंद पाटील, संचालक, स्टडी सर्कलएमपीएससीचा कारभार यूपीएससीप्रमाणे असणे आवश्यक आहे. एमपीएससीने यूपीएससीप्रमाणेच विद्यार्थ्यांचे प्रमाण ठेवणे गरजेचे आहे. विद्यार्थांची मागणी योग्य असून, एमपीएससी व शासनाने त्यानुसार निर्णय घेणे गरजेचे आहे.- अविनाश धर्माधिकारी, माजी सनदी अधिकारी
एमपीएससीविरोधात विद्यार्थी रस्त्यावर
By admin | Updated: May 6, 2015 06:15 IST