पुणे : आपल्याला हव्या असणाऱ्या महाविद्यालयात बारावीकरिता प्रवेश मिळाला नाही म्हणून एका विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याची घटना जनता वसाहत परिसरात घडली. आकाश ज्ञानेश्वर सदाफुले (वय 18, रा. जनता वसाहत) असे आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे. याप्रकरणी विद्यार्थ्याच्या पालकांनी संबंधित महाविद्यालयावर कारवाई करावी. असा अर्ज दत्तवाडी पोलिस ठाण्यात दिला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आकाशला शाहु महाविद्यालयात विज्ञान शाखेत प्रवेश घ्यायचा होता. त्याने अकरावी पर्यंतचे शिक्षण एस पी महाविद्यालयातून पूर्ण केले होते. यंदाच्या वर्षी त्याला शाहु महाविद्यालयात बारावीचे वर्ष पूर्ण करायचे होते. मात्र त्याला तो प्रवेश मिळाला नाही. यामुळे नैराश्याच्या गर्तेत जाऊन त्यांनी आत्महत्या केली. आकाशने आत्महत्या करताना रोहन या आपल्या मित्राला ‘ रोहन आय विल गोईंग टू सुसाईड’ असा मेसेज व्हाटसअपवरुन पाठवला होता. त्यानंतर मंगळवारी रात्री साडेअकराच्या सुमारास राहत्या घरात गळयाला फास लावून त्याने आकाशने आत्महत्या केली. बुधवारी आकाशच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले आहे. गेल्या काही दिवसांपासून आकाशची मनस्थिती ठिक नव्हती. बारावीकरूता शाहु महाविद्यालयात प्रवेश मिळावा याकरीता त्याचा प्रयत्न सुरु असल्याचे आकाशच्या पालकांनी पोलिसांना देण्यात आलेल्या अर्जात म्हटले आहे.माहिती दत्तवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक देविदास घेवारे यांनी दिली. पोलिसांनी पालकांना व्यवस्थित समजावून मार्गदर्शन केले. पालकांनी महाविद्यालयाविरोधात तक्रार दाखल करण्याचा अर्ज पोलिसांना दिला आहे. यावर पोलिसांकडून योग्य ती माहिती घेऊन त्यानुसार कारवाई केली जाणार असल्याचे सांगितले.
आकाशच्या आत्महत्येस महाविद्यालयच जबाबदार आहे. असे म्हणून पालकांनी प्राचार्यांच्या केबिनबाहेर आकाशचा मृतदेह ठेवला हाेता. यावेळी गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती. मात्र वेळीच दत्तवाडी पोलिसांनी हस्तक्षेप करुन पालकांना समजावून मृतदेह ताब्यात घेऊन अंत्यसंस्कार करण्याची विनंती केली.