पुणे: कोरोनाच्या संचारबंदीने अनेकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. सामान्य नागरिकाला आर्थिक संकटाला सामोरे जावे लागत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शाळा बंद असून त्या ऑनलाईन पद्धतीने सुरु ठेवण्यात आल्या आहेत. या ऑनलाईन शाळांमध्येही पूर्ण फी आकारली जात आहे. पालकांच्या आर्थिक संकटाचा विचार करून शाळांनी ५० टक्के शुल्क माफ करावे. अशी मागणी करत पुण्यातील महात्मा फुले मंडईत महाराष्ट्र नागरी कृती समिती, वंदे मातरम् संघटना आणि जय मल्हार क्रांती संघटना यांच्या वतीने आंदोलन करण्यात आले.
"ज्या महाराष्ट्रात कर्मवीर भाऊराव पाटील यांनी मुलांनी शिकावे, यासाठी बायकोचे मंगळसूत्र मोडले, ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले, महात्मा जोतिराव फुले, अहिल्याबाई होळकर, रमाबाई आंबेडकर यांनी आपले संपूर्ण जीवन मुला-मुलींनी शिकावे म्हणून समाजासाठी वाहिले. अशा महाराष्ट्रात मध्यमवर्गीय, गरीब जे जागतिक कोरोना महामारीमुळे आधीच त्रस्त आहेत. यांना शाळांमार्फत पूर्ण शुल्क भरावे, यासाठी तगादा लावला जातोय. शाळांमध्ये यावर्षी सांस्कृतिक उपक्रम, क्रीडाविषयक उपक्रम, मुलांना शाळेत देण्यात येणारे डबे या कोणत्याच गोष्टी झालेल्या नाहीत. या सगळ्याचे पैसे पालकांनी का द्यावे? असा सवाल संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी उपस्थित केला आहे.''
शुल्क भरले नाही तर शिक्षण संस्था आणि शाळा ऑनलाइन शिक्षण बंद करीत आहेत. मुलांना रिझल्ट न देणे, वह्या-पुस्तके न देणे असे प्रकार सर्रास शाळांमार्फत केले जात आहेत. याविरुद्ध आवाज उठवण्यासाठी आता पालकांनी एकत्र येणे गरजेचे आहे. असे आवाहन पालकांना संघटनांच्या वतीने करण्यात आले आहे.