सासवड : नारायणपूर (ता. पुरंदर) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या भिंतीवर असणारी नावाची कमान व्हरांड्याच्या पत्र्यावर पडून व पत्रा अंगावर पडल्याने चार लहान मुले जखमी झाल्याची घटना घडली. यामध्ये तीन मुले आणि एका मुलीचा समावेश आहे. सर्व मुले १ ली ते ५ वीच्या वर्गातील आहेत. घटना घडण्याच्या पूर्वी त्याच व्हरांड्यात विज्ञान प्रदर्शन सुरू होते. दुपारी जेवणाची बेल झाल्यानंतर सर्व मुले वर्गातून जेवणाचे डबे घेऊन बाहेर जात होती. त्याच वेळी पत्रा अंगावर पडून ही घटना घडली. केवळ ५ ते १० मिनिटांत ही घटना घडली, अन्यथा मोठी दुर्घटना घडली असती.यामध्ये हर्षदा विकास पोटे (वय ११), आर्यन रामदास बोरकर (वय ७), समर्थ रोहिदास राऊत (वय ११) आणि करण रेशमाजी वाघमारे (वय ७) हे चार विद्यार्थी जखमी झाले. यातील हर्षदा विकास पोटे या विद्यार्थिनीस पत्रा कापून जास्त मार लागला आहे. घटनेनंतर सर्व विद्यार्थ्यांना सासवड येथील खासगी रुग्णालयात हलविण्यात आले.नारायणपूर येथे प्राथमिक शाळेच्या इमारतीमध्ये इयत्ता पहिली ते पाचवीचे वर्ग नेहमीप्रमाणे सुरू होते. बुधवारी शाळेत विज्ञान प्रदर्शन असल्याने शाळेच्या व्हरांड्यात सर्व मुले व्यस्त होती. सकाळी १२ ते १.३० या वेळेत विज्ञान प्रदर्शन होते. दुपारी दीड वाजता नेहमीप्रमाणे जेवणाच्या सुटीची बेल झाल्याने सर्व मुले वर्गातून जेवणाचे डबे घेऊन बाहेर पडत होती. काही मुले बाहेर आली, तर काही मुले बाहेर येत असताना अगोदरच पडायला झालेल्या शाळेच्या व्हरांड्यावरील कमानीची भिंत व पत्रे अचानक खाली पडले. यावेळी पाच ते सहाच मुले तेथे होती. अचानक घडलेल्या घटनेने एकच गोंधळ उडाला.या घटनेची माहिती मिळताच पुरंदरचे तहसीलदार अतुल म्हेत्रे, नायब तहसीलदार धनंजय जाधव, गटशिक्षणाधिकारी राजेसाहेब लोंढे यांनी घटनास्थळी जाऊन माहिती घेतली. तसेच सासवड येथे पंचायत समिती सभापती अर्चना जाधव, जिल्हा परिषद सदस्य दिलीप यादव, गटविकास अधिकारी मिलिंद टोणपे, प्रांताधिकारी संजय आसवले, प्रदीप पोमण, विठ्ठल मोकाशी यांनी जखमी विद्यार्थ्यांची विचारपूस केली.या शाळेच्या दुरुस्तीसाठी दीड लाख रुपयांचे अनुदान जरी जमा झाले असले तरी त्यामध्ये वर्गखोल्यांचे पत्रेदेखील येणार नाहीत. तसेच या रकमेत दुरुस्ती होऊ शकत नसल्याने नवीन वर्गखोल्या बांधून मिळाव्यात, यासाठी ग्रामपंचायत व ग्रामस्थ पाठपुरावा करीत आहेत. याचदरम्यान शाळेच्या वरील कमान भिंत पत्र्यावर पडून ही दुर्घटना घडल्याचे शाळा समितीचे रामभाऊ बोरकर यांनी सांगितले.
शाळेची कमान व पत्रा अंगावर पडून विद्यार्थी झाले जखमी
By ऑनलाइन लोकमत | Published: December 13, 2018 2:00 AM