- राहुल गायकवाडपुणे : आपल्या विविध योजना तळागाळातील जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी राज्य सरकार आता महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा वापर करणार आहे. माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाने ‘युवा माहिती दूत’ हा उपक्रम हाती घेतला असून, राज्यभरातील महाविद्यालये आणि विद्यापीठांमधील १ लाख युवकांमार्फत दोन कोटी जनतेपर्यंत पोचण्याची तयारी केली आहे.सरकारी योजनांची माहिती वृत्तपत्रे, दूरचित्रवाणी, रेडिओ यांच्यामार्फत पोहोचवली जाते, परंतु लाभ घेऊ शकतील असे अनेक जण अर्धशिक्षित, दारिद्र्यरेषेखालील आणि दुर्गम भागातील असल्याने त्यांच्यापर्यंत ही माहिती पोहोचतेच असे नाही. राज्यात ६ हजारांपेक्षा जास्त महाविद्यालये २३ लाखांपेक्षा जास्त विद्यार्थी तेथे शिकतात. त्यापैकी किमान १ लाख युवक या उपक्रमात सहभागी होतील, अशी सरकारची अपेक्षा आहे. त्यासाठी प्रत्येक महाविद्यालयातील सहभागी विद्यार्थ्यांमागे एक मार्गदर्शक नेमण्यात येणार आहे. अध्यापक, ग्रंथपाल, अधीक्षक, क्रीडा शिक्षक यापैकी एकाची युवा माहिती दूत मार्गदर्शक म्हणून निवड करण्यात येईल. राज्य सरकारने या योजनेच्या अंमलबजावणीसाठी विशेष मोबाइल अॅप तयार केले आहे.पत्र पाठविले...शिक्षण सहसंचालकांकडून सर्व विद्यापीठ, तसेच कॉलेजांना याबाबतचे पत्र पाठविण्यात आले आहे. युनिसेफ आणि उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या प्रत्यक्ष सहयोगाने हा उपक्रम हाती घेतल्याचे त्यात म्हटले आहे.
विद्यार्थी बनणार ‘माहिती दूत’; शासकीय योजना तळागाळात पोहोचविणार
By ऑनलाइन लोकमत | Published: August 04, 2018 2:44 AM