पुणे- स्पर्धा परीक्षांमधील अनियमितता दूर करावी, राज्यातील १ लाख ७० हजार रिक्त पदे तातडीने भरावीत, राज्यसेवा परीक्षेच्या पदांमध्ये वाढ करावी अशा विविध मागण्यांसाठी स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांनी गुरूवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला आहे. हातामध्ये मागण्यांचे फलक घेऊन मोठ्या संख्येने विद्यार्थी मोर्चात सहभागी झाले आहेत.स्पर्धा परीक्षा विद्यार्थी समनव्य समितीच्यावतीने राज्यातील विविध शहरांमध्ये या मोर्चाचे आयोजन केले आहे. पुण्यामध्ये आज (गुरुवार) सकाळी साडे दहाच्या सुमारास शनिवार वाडा येथून मोर्चाला सुरुवात झाली आहे. पुण्यात स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्याची संख्या मोठी असल्याने मोर्चाला चांगला प्रतिसाद मिळाला आहे.
या आहेत विद्यार्थ्यांच्या प्रमुख मागण्या- राज्यातील १ लाख ७० हजार रिक्त पदे लवकरात लवकर भरण्यात यावीत. - केंद्र सरकारच्या ४ लाख २० हजार जागा रद्द न करता त्यादेखील त्वरित भरण्यात याव्यात. - राज्यसेवेच्या ६९ पदांमध्ये वाढ करण्यात यावी, प्रत्येक पदाकरिता प्रतीक्षा यादी लावण्यात यावी.- स्पर्धा परीक्षेमध्ये चाललेल्या डमी सारख्या गैरप्रकारांचा तपास सीबीआयकडे सोपवावा, बायोमेट्रिक पद्धतीने उमेदवारांची हजेरी घ्यावी.- आयोगाकडून जे प्रश्न चुकतात किंवा रद्द होतात त्यांचे संदर्भासहित स्पष्टीकरण आयोगाने द्यावे.- परीक्षा केंद्रावरती मोबाइल जॅमर सारखी यंत्रणा बसवावी.- स्पर्धा परीक्षांमधील भरती घोटाळा उघडकीस आणणारे योगेश जाधव यांच्या सुरक्षेमध्ये वाढ करावी.- परीक्षा केंद्रामधील बैठक व्यवस्था हि सुसज्ज असावी, परीक्षेसाठीची प्रवेश फी हि माफक असावी जेणेकरून सर्वसामान्य विद्यार्थ्यांना आर्थिक भुर्दंड बसणार नाही. - खाजगी तत्वावर तात्पुरती पदे भरण्याची पद्धत रद्द करून कायमस्वरूपी पदे भरण्यात यावी.- संयुक्त परीक्षा पद्धत रद्द करून पूर्वी प्रमाणे स्वतंत्र परीक्षा पद्धत राबवावी, - विक्रीकर निरीक्षक मुख्य परीक्षेसाठीचे केंद्र हे नागपूर याठिकाणी ठेवावे.