पुणे : आजची तरुण पिढी आजूबाजूच्या परिस्थितीबाबत फारशी सजग नाही, अशी टीका त्यांच्यावर केली जाते. मात्र नुकत्याच झालेल्या एका परिषदेत वेगळेच चित्र दिसले. स्त्रियांच्या आजच्या स्थितीवर अतिशय अभ्यासपूर्ण मते विद्यार्थ्यांनी त्यात मांडली. ही परिषद होती फर्ग्युसन आणि मॉडर्न महाविद्यालयातर्फे आयोजित ‘मिस-मेडिया.’ जर्मन भाषेच्या भारतातील शिक्षणाच्या शतक महोत्सवी वर्षाच्या निमित्ताने तिचे आयोजन करण्यात आले होते. शिक्षणाचा उद्देश नुसता विद्यार्थ्यांना विषयाचे ज्ञान देणे हा नाही. तर त्याचबरोबर त्यांना आजूबाजूच्या परिस्थितीसंदर्भात जागृत करणे हाही आहे. समाजात आपल्या बाजूला जे काही बरे-वाईट घडते आहे त्याचे भान त्यांना असणे आवश्यक आहे. या दृष्टिकोनातून स्त्रियांची पिळवणूक, स्त्री-पुरुष भेद, स्त्रियांवरचे अत्याचार यासारख्या मुद्द्यांवर विद्यार्थ्यांनी विचार मांडावेत, अशी या परिषदेमागची कल्पना होती. सेन्सॉरने अधिक जबाबदारीने काम करावे आणि स्त्रियांनी या धंदेवाईक वृत्तीला विरोध करावा, अशी अपेक्षाही व्यक्त केली. जर्मन भाषातज्ज्ञ एव्हलीन रेगेनफुस यांनी जर्मनीच्या माध्यमातही स्त्रीचे चित्रण वाईटच होत असल्याचे सांगितले. डॉ. शर्मिष्ठा खेर यांचेही भाषण झाले. फग्युसर्न महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. रवींद्रसिंह परदेशी आणि मॉडर्न महविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजेंद्र झुंझरराव उपस्थित होते. (प्रतिनिधी)
स्त्रियांच्या प्रश्नांवर विद्यार्थी सजग
By admin | Published: August 29, 2014 4:39 AM