पुणे: वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी घेतली जाणारी नीट परीक्षा पुढे ढकलण्यात आल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये निराशेचे वातावरण असून अनेकांचा परीक्षेला सामोर जाण्याचा संयमही आता सुटला आहे.त्यामुळे केंद्र शासनाने व्यावसायिक अभ्यासक्रमाचे शैक्षणिक वर्ष जानेवारी 2021 पासूनच सुरू केले तर उचित ठरेल,असे मत प्रवेश पूर्व परीक्षांच्या अभ्यासकांकडून व्यक्त केले जात आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर इंजिनिअरिंग व वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी घेतल्या जाणाऱ्या जेईई व नीट परीक्षेच्या वेळापत्रकात पुन्हा बदल करण्यात आला आहे. त्यानुसार एमबीबीएस व बीडीएस अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी घेतली जाणारी नीट परीक्षा आता 13 सप्टेबर रोजी घेतली जाणार आहे. कोरोनामुळे जुलै महिन्यात घेतली जाणारी नीट परीक्षा पुन्हा पुढे ढकलण्यात आली. त्यामुळे विद्यार्थी नाराज आहेत. नीटच्या तयारीसाठी अनेक विद्यार्थ्यांनी एप्रिल 2019 पासून तयारी सुरू केली. वर्ष उलटून गेले तरी परीक्षा झाली नाही. त्यामुळे एकाच परीक्षेचा आणखी किती दिवस अभ्यास करायचा, अशी भावना विद्यार्थ्यांमध्ये निर्माण झाली आहे.प्रवेश पूर्व परीक्षांचे अभ्यासक व डीपरचे सचिव हरिष बुटले म्हणाले, इंजिनिअरिंग मेडिकल सारख्या प्रवेश पूर्व परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांचा सय्यम पूर्णपणे सुटत चालला आहे. परीक्षांच्या तारखा सतत बदलत असल्यामुळे विद्यार्थी तणावाखाली आहेत.सप्टेबरम महिन्यात सुध्दा परीक्षा होणार की नाही? याबाबत स्पष्टता नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना आणखी तणावाखाली न ठेवता जानेवारी 2021 पासूनच नवीन शैक्षणिक वर्ष सुरू केलेले योग्य होईल. प्रवेश पूर्व परीक्षांचे अभ्यासक दिलीप शहा म्हणाले,नीट परीक्षेच्या तयारीसाठी घेतल्या जाणाऱ्या सराव परीक्षांना सुध्दा विद्यार्थ्यांकडून कमी प्रतिसाद मिळत आहे. अनेक विद्यार्थी एका वषार्पेक्षा अधिक कालावधीपासून अभ्यास करत आहेत.परंतु,पूर्वी सराव परीक्षांमध्ये चांगले गुण मिळवणारे विद्यार्थी आता 620 पैकी 200 ते 300 गुण मिळत आहेत. यावरून विद्यार्थ्यांचा संयम सुटल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे शासनाने व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या शैक्षणिक वर्षातच बदल करणे उचित ठरेल.
विद्यार्थ्यांचा संयम सुटला, नीट परीक्षा पुढे ढकलल्याने तीव्र नाराजी
By ऑनलाइन लोकमत | Published: July 04, 2020 6:15 PM
केंद्र शासनाने व्यावसायिक अभ्यासक्रमाचे नवे शैक्षणिक वर्ष जानेवारीपासून सुरू करावे.
ठळक मुद्देपरीक्षांच्या तारखा सतत बदलत असल्यामुळे विद्यार्थी तणावाखाली नीट परीक्षेच्या तयारीसाठी घेतल्या जाणाऱ्या सराव परीक्षांना सुध्दा विद्यार्थ्यांकडून कमी प्रतिसाद