पुणे : ई-अाधार कार्डची संपूर्ण प्रिंट नसल्याचे कारण देत विद्यार्थ्यांना बॅंकेची परीक्षा देण्यापासून वंचित ठेवल्याचे प्रकरण ताजे असताना पुन्हा एकदा असेच प्रकरण समाेर अाले अाहे. एमएसईबीच्या सहाय्यक अभियंता परीक्षेसाठी अालेल्या 25 ते 30 विद्यार्थ्यांना स्मार्ट अाधार कार्ड चालत नसल्याचे कारण देत परीक्षेपासून वंचित ठेवण्यात अाल्याचा प्रकार रामटेकडी इंडस्ट्रिअल परीक्षा केंद्रात घडला अाहे. हाॅल टिकीटवर ई-अाधार कार्ड चालणार नसल्याचे लिहीलेले असताना एैनवेळी विद्यार्थ्यांकडे ई-अाधार कार्डची मागणी करण्यात अाली. वस्तूतः विद्यार्थ्यांकडे स्मार्ट अाधार कार्ड असताना ते वैध नसल्याचे कारण देत त्यांना राेखण्यात अाले.
महाराष्ट्राच्या विविध भागांमधून एमएससीबीची सहाय्यक अभियंता परीक्षेसाठी अाज विद्यार्थी रामरटेकडी इंडस्ट्रीअल परीक्षा केंद्रावर अाले हाेते. अायबीपीएस तर्फे ही परीक्षा घेण्यात येत हाेती. यावेळी ज्या विद्यार्थ्यांकडे स्मार्ट अाधार कार्ड हाेते, त्यांना प्रवेशापासून राेखण्यात अाले. विद्यार्थ्यांकडे ई-अाधार कार्डची मागणी करण्यात अाली. तसेच ई-अाधार कार्डची संपूर्ण प्रिंट असल्याशिवाय अात साेडण्यात येणार नसल्याचे सांगण्यात अाले. यावर विद्यार्थ्यांनी हाॅल तिकीटवर ई-अाधार कार्ड ग्राह्य धरण्यात येणार नसल्याचे लिहीण्यात अाल्याचे सांगितले. त्यावर अर्ध्या तासापूर्वी अालेल्या अादेशानुसार ई-अाधार कार्ड चालणार असल्याचे विद्यार्थ्यांना सांगण्यात अाले. विद्यार्थ्यांनी अादेशाची प्रत मागीतली असता विद्यार्थ्यांना उडवाउडवीची उत्तरे देण्यात अाली. ज्या विद्यार्थ्यांकडे स्मार्ट अाधार कार्ड हाेते त्यांना बाहेर काढण्यात अाले.
याविषयी बाेलाताना सासवड वरुन अालेली विद्यार्थीनी भाग्यश्री गायकवाड म्हणाली, 2015 साली या परीक्षेसाठी जागा निघाल्या हाेत्या. त्यानंतर अाज ही परीक्षा हाेत अाहे. अाम्ही गेले 3 वर्ष या परीक्षेची तयारी करत हाेताे. याअाधी दिलेल्या अनेक परीक्षांमध्ये अामच्याकडील स्मार्ट अाधार कार्ड ग्राह्य धरत प्रवेश देण्यात अाला हाेता. या परीक्षा केंद्रावर मात्र अाम्हाला स्मार्ट अाधार कार्ड चालणार नसल्याचे सांगण्यात अाले. तसेच ई- अाधार कार्डची मागणी करण्यात अाली. हाॅल तिकीटवर ई-अाधार कार्ड चालणार नसल्याचे स्पष्ट लिहीलेले असताना एैनवेळी ई- अाधार कार्ड चालणार असल्याचे सांगण्यात अाले. जे विद्यार्थी गेट 2 ने अात गेले त्यांना स्मार्ट अाधार कार्डने साेडण्यात अाले. जे विद्यार्थी गेट 3 ने जाणार हाेते त्यांना अडवण्यात अाले. गेट 3 च्या कर्मचाऱ्यांची तक्रार केली असता त्यांच्यात स्मार्ट कार्ड वैध अाहे की नाही याबाबत कुठलिही स्पष्टता नसल्याचे दिसून अाले. अाम्हाला शेवटपर्यंंत अात जाऊ दिले ऩाही. त्यामुळे अाम्हाला परीक्षा देता अाली नाही. अामच्या करिअरचा प्रश्न यामुळे निर्माण झाला अाहे.