इंदापूर : संविधान दिनानिमित्त जागेची साफसफाई करण्यासाठी गेलेल्या भिमाई आश्रमशाळेचे संस्थाचालक, महिला कर्मचारी व इतरांना शिवीगाळ करणा-यास विचारणा करणा-या संस्थाचालकांच्या मुलास मारहाण करून त्याच्या गळ्यातील सोन्याची दीड तोळ्याची चेन तोडून पळून गेला. संस्थेच्या खोल्यांची कुलपे तोडून सामानाची चोरी केली. या आरोपावरून तिघा जणांविरुद्ध इंदापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.सुधीर ऊर्फ युवराज अर्जुन पोळ, अक्षय सुधीर पोळ, सम्राट सुधीर पोळ ( सर्व रा.इंदापूर) अशी आरोपींची नावे आहेत. रत्नाकर मल्हारी मखरे (रा. भिमाई आश्रमशाळा, मखरेवस्ती, इंदापूर) यांनी त्यांच्या विरुद्ध फिर्याद दिली आहे.पोलिसांनी सांगितले की, फिर्यादी रत्नाकर मखरे हे भिमाई आश्रम शाळेचे अध्यक्ष आहेत. संविधान दिनानिमित्त आश्रमशाळेतील मुलांची शहरातून प्रभातफेरी काढणे, छत्रपती शिवराय व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यांना अभिवादन करणे व त्यानंतर नगर परिषदेने दिलेल्या तळ्याजवळच्या जागेची साफसफाई करण्याच्या आश्रमशाळेचा नियोजित कार्यक्रम होता. पहिले दोन कार्यक्रम पार पडल्यानंतर जागेची साफसफाई करण्यासाठी हे सर्वजण गेले. तहसीलदार श्रीकांत पाटील यांच्या हस्ते तेथे पूजा झाली. तहसीलदार निघून गेल्यानंतर दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास स्वच्छतेच्या कामास सुरुवात झाली. त्या वेळी तेथे उपस्थित असणाºया आरोपींनी ही जागा आमची आहे. तुम्ही तेथे यायचे नाही, असे धमकावत महिला कर्मचाºयांसह सर्वांना अश्लील शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. संस्थेच्या चार-पाच खोल्यांच्या दारांची कुलपे तोडल्याचे व त्या मधील सामान चोरीस गेल्याचे फिर्यादीच्या लक्षात आल्यानंतर त्याने सुधीर पोळ यास त्याबाबत विचारणा केल्यानंतर खोलीतील सामान माझेच होते. मीच कुलपे तोडली. आतले सामान माझेच होते. मीच विकले, असे पोळ याने सांगितले. त्यानंतर महिला कर्मचाºयांना आरोपींनी अर्वाच्य शिवीगाळ करण्यास सुरुवात केली.फिर्यादीचा मुलगा संतोष मखरे तेथे आला. महिलांना कशासाठी शिवीगाळ करता, असे त्याने विचारले. त्यावेळी तीनही आरोपींनी त्याला मारहाण केली.सुधीर पोळने संतोषच्या गळ्यातील सोन्याची दीड तोळ्याची चेन हाताने हिसका मारुन तोडली व तेथून पळून गेला.अशा आशयाच्या फिर्यादीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फौजदार सुशांत किनगे अधिक तपास करत आहेत.आरोपींवर जोपर्यंत कारवाई होत नाही, तोपर्यंत भिमाई आश्रमशाळेचे वर्ग पोलीस ठाण्याच्या आवारात भरवण्यात येईल. शिक्षक व विद्यार्थ्यांचा मुक्काम तिथेच राहील, असा इशारा रत्नाकर मखरे यांनी निवेदनाद्वारे इंदापूरच्या पोलीस निरीक्षकांना दिला आहे. सर्वच जण पोलीस ठाण्याच्या आवारात ठाण मांडून बसले आहेत.
संस्थेची नासधूस करणाºया आरोपींना अटक करा, विद्यार्थ्यांसह शिक्षकांचा इंदापूर पोलीस ठाण्याबाहेर ठिय्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 27, 2017 3:43 AM