पिंपरी : येथील डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाच्या दीक्षान्त समारंभात विद्यार्थ्यांनी यशाचा जल्लोष साजरा केला. सेवाभाववृत्ती जोपासावा, असा कानमंत्र केंद्रीय मंत्री डॉ. हर्ष वर्धन यांनी देण्याबरोबरच महाविद्यालयीन जीवनातील गुरूंच्या आठवणी सांगितल्या.दीक्षान्त समारंभात प्रारंभी ‘जय शारदे वागेश्वरी...’ हे शारदास्तवन सादर केले. त्यानंतर ‘नव्या जाणिवा नवीन स्वप्ने...’ हे विद्यापीठ गीत सादर झाले. भारतरत्न डॉ. सी. एन आर राव यांनी पुण्याविषयी कृतज्ञता व्यक्त केली. त्यानंतर हर्ष वर्धन यांनी डॉ. राव यांच्याविषयी गौरवोद्गार काढले. ते म्हणाले, ‘‘राव यांचे विज्ञान क्षेत्रातील योगदान अतुलनीय आहे. प्रखर ध्येयवादी, समर्पित भावनेने काम करणारी ही व्यक्ती आहे. कठीण परिश्रमातून त्यांनी मिळविलेले स्थान तरुणांना प्रेरणादायी आहे. आज महाविद्यालयीन जीवनातील आठवणी ताज्या झाल्या. या वेळी गुरूचा कानमंत्र अजूनही आठवतो. ‘जीवनात चढ-उतार असतातच. कितीही अडचणी आल्या, तरी जीवनात इमानदारीच्या शिडीने यशोशिखरावर पोहोचण्याचा प्रयत्न करा, हा कानमंत्र मी विसरलेलो नाही. जीवनात ध्येयवाद हवा, त्याचबरोबर चांगला माणूस बनण्याचा प्रयत्न करा.’’या वेळी अरुण मोरे, धनंजय क्षीरसागर, सचिन सरोदे, गार्गी सरोदे, अलोक व्यास, अपर्णा आचार्य, चंद्रशेखर पटगर, जयंतलाल सोळंकी, रवींद्र कुलकर्णी, अनामिका सिंग, श्रद्धा पुरंदरे, नितीन देशपांडे, संदीप शिंदे, प्रकाश शर्मा यांना पीएच. डी. प्रदान करण्यात आली. तसेच पल्लवी मुखर्जी (एमबीबीएस), गरिमा लखपाल (फार्माकालॉजी), सारिका सेठिया (आॅप्टोमालॉजी), पल्लव आगरवाल, तुसकानो लुईस, आकांक्षा सिंग, कीर्ती शुक्ला, निवेदिता सिंग, पूजा वैद्य, प्रियंका सावंत, केतकी करंदीकर, ज्योत्स्ना नायकडे, सुवर्णा डोके, सुजी मर्लियन यांना सुवर्णपदक प्रदान करण्यात आले. (प्रतिनिधी)
विद्यार्थ्यांनी केला यशाचा जल्लोष
By admin | Published: April 04, 2016 1:12 AM