पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये आज पदवीप्रदान समारंभ पार पडला. या समारंभानंतर आपल्याला मिळालेली डिग्री हातात घेत काही विद्यार्थ्यांनी जेएनयुतील विद्यार्थ्यांवर झालेल्या हल्ल्याचा निषेध केला तसेच सीएए आणि एनआरसी या कायद्यांना देखील विराेध दर्शवला. यावेळी पाेलिसांचा माेठा बंदाेबस्त तैनात करण्यात आला हाेता.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा 116 वा पदवीप्रदान समांरभ आज पार पडला. या साेहळ्याला राज्यपाल भगतसिंग काेश्यारी हे अध्यक्षस्थानी हाेते. यावेळी पीएचडी ते प्रमाणपत्र अशा एकूण एक लाख नऊ हजार नऊशे तीस पदव्या प्रदान करण्यात आल्या. पदवीप्रदान साेहळ्यानंतर अनेक विद्यार्थ्यांनी विद्यापीठाच्या मुख्य इमारतीच्या समाेर येत आंदाेलन केले. यात जेएनयुतील विद्यार्थ्यांवर झालेल्या हल्ल्याचा निषेध करण्यात आला. तसेच सीएए आणि एनआरसी या दाेन्ही कायद्यांना विद्यार्थ्यांनी विराेध दर्शवला.
याबाबत बाेलताना साद अहमद हा विद्यार्थी म्हणाला, अनेकदा लाेक म्हणतात सीएए आणि एनआरसी विराेधात आंदाेलन करणाऱ्या विद्यर्थ्यांना काही माहित नाही. कायद्याबद्दल त्यांनी अभ्यास केलेला नाही. आम्हाला त्या नागरिकांना या आंदाेलनाच्या माध्यमातून सांगायचे हाेते की आम्ही उच्च शिक्षण घेतले असून सीएए आणि एनआरसी या दाेन्ही कायद्यांचा अभ्यास केल्यानंतरच त्यांना विराेध करत आहाेत. स्मितेश जाेशी म्हणाला, आजच्या पदवीप्रदान साेहळ्याला जेएनयुतील हल्ल्याची तसेच देशभरात सीएए आणि एनआरसी या दाेन्ही कायद्यांना हाेत असलेल्या विराेधाची पार्श्वभूमी हाेती. आम्ही आज या आंदाेलनातून सामान्य विद्यार्थ्यांची भूमिका मांडली. आमच्यासाठी आमची डिग्री महत्त्वाची आहेच परंचु देशातील परिस्थितीवर बाेलणेही तितकेच महत्त्वाचे आहे.
दरम्यान फुले- शाहू- आंबेडकर विद्यार्थी कृती समितीच्या वतीने राज्यपालांना आपल्या मागण्यांचे निवेदन देण्यात आले. यात सीएए, एनआरसी आणि एनपीआर लागू न करण्याबाबतची विनंती हाेती. तसेच पुणे विद्यापीठामधील विद्यार्थ्यांच्या समस्यांबाबतचे निवेदन देखील हाेते.