परीक्षांच्या तारखा माहिती नाहीत : त्यात तिसऱ्या लाटेची भीती
अमोल अवचिते
पुणे : पुणे महानगरपालिकेने स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांना दिलासा देण्यासाठी ५० टक्के उपस्थितीसह क्लास सुरू करण्यास परवानगी दिली आहे. मात्र, कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या चर्चेने आणि विद्यार्थ्यांच्या अल्प प्रतिसादामुळे खासगी कोचिंग क्लास चालकांनी ‘थांबा आणि वाट पाहा’ धोरण राबविले जाणार असल्याचे ‘लोकमत’ला सांगितले.
महानगरपालिकेने यापूर्वी १४ जून रोजी क्लास सुरू करण्यास परवानगी दिली होती. मात्र, पुन्हा २६ जूनला परवानगी नाकारली. या दरम्यान अनेक क्लास चालकांनी प्रवेश देण्यास सुरुवात केली. मात्र, परवानगी नाकारल्याने विद्यार्थी आणि क्लास चालकांना त्रास सहन करावा लागला. आता पुन्हा परवानगी दिली असली तरी पुढच्या काही दिवसांत या निर्णयात बदल होऊ शकतो, या भीतीने क्लास सुरू करणे आर्थिकदृष्ट्या योग्य होणार नाही. त्यामुळे परवानगी मिळाली आणि लगेचच क्लास सुरू झाले, असे होणे कठीण आहे. पालिका निर्णय बदलणार नाही हे कोणत्याच आधारावर सांगता येणार नाही, असे काही खासगी क्लासचालकांनी सांगितले.
शहरात स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या अधिक आहे. त्यामुळे खासगी क्लासचालक, अभ्यासिका, आदी संख्येसह कोट्यवधी रुपयांची आर्थिक उलाढाल मोठ्या प्रमाणात होते. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे व्यावसायिकांना मोठ्या प्रमाणावर आर्थिक फटका बसला आहे. गेल्या एक ते दीड वर्षापासून क्लास बंद आहेत. ऑनलाइन वर्ग चालविणे कठीण आहे. कारण, किमान एक ते दोन तासांचे सत्र असते. तसेच अधिक संख्येने विद्यार्थी ग्रामीण भागातील आहेत. त्यामुळे ऑनलाईन वर्गाला अनेक अडचणी येतात. शहरात क्लास लावायचा असेल तर खोली, मेस, अभ्यासिका या सर्व गोष्टींसाठी पैसे लागतात. हे सर्व करून जर पुन्हा क्लास बंद करण्यास सांगितले तर अर्थिक तोटा सहन करावा लागेल, असे एका विद्यार्थ्याने सांगितले.
चौकट
स्पर्धा परीक्षेच्या मार्गदर्शनासाठी सर्वच विद्यार्थी क्लास लावत नाहीत. सद्यपरिस्थितीत विद्यार्थ्यांचा अल्प प्रतिसाद आहे. पदवीनंतर या क्षेत्रात येणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या अधिक असते. या परिस्थितीमुळे किती पालक आपल्या पाल्याला शहरात सोडतील हा प्रश्न आहे. पुणे कधी बंद होऊ शकते हे सांगता येणार नाही.
- महेश शिंदे, खासगी क्लासचालक
केवळ पुण्यासारख्या शहरासाठी निर्णय न घेता इतर शहरांचादेखील नियमावली आखून विचार करण्याची गरज आहे. स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे विद्यार्थी मुळातच १८ वर्षांपुढील आहेत. ऑनलाईन शिक्षणाचा प्रभाव हवा तेवढा होतोच असे नाही.
- मनोहर भोळे, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक आणि खासगी क्लासचालक
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (एमपीएससी) या वर्षातील परीक्षांचे वेळापत्रक जाहीर केलेले नाही. त्यामुळे पुढील परीक्षा कधी होणार आहेत, याची माहिती नाही. तसेच कोरोनाची तिसरी लाट आली तर परीक्षा होतीलच असे नाही, अशी भीती सध्या विद्यार्थ्यांमध्ये आहे. तसेच अर्थिक अडचणीमुळे पैसे खर्च करून क्लास लावणे या परिस्थितीत परवडणारे नाही.
-रमेश पाटील, परीक्षार्थी