पुणे : गुरुत्वीय लहरींबाबत अल्बर्ट आइन्स्टाईनने केलेले संशोधन आणि गुरुत्वीय लहरींचा शोध लागल्याची नुकतीच करण्यात आलेली घोषणा यामुळे मनात निर्माण झालेल्या अनेक प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी विज्ञानप्रेमींनी रविवारी विज्ञानदिनानिमित्त इंटर-युनिव्हर्सिटी सेंटर फॉर अस्ट्रोनोमी एंड एस्ट्रोफिसिक्सला (आयुका) भेट दिली. तसेच विज्ञानाच्या आधारे विविध टाकाऊ वस्तूंच्या साहाय्याने खेळणी कशी करता येऊ शकतात, याचीही माहिती घेतली. रविवारी शाळांना सुट्टी असूनही पुणे शहरातील व परिसरातील विद्यार्थ्यांनी आयुकात गर्दी केली होती.विज्ञानदिनाचे औचित्य साधून शहरातील विविध वैज्ञानिक संस्थांमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. आयुकामध्ये दर वर्षी जगभरातील शास्त्रज्ञांनी लावलेल्या विविध शोधांची माहिती दिली जाते. तसेच शास्त्रज्ञांची व्याख्याने आयोजित केली जातात. मात्र, यंदा शतकातील सर्वांत मोठा शोध म्हणून पाहिला जात असलेल्या गुरुत्वीय लहरींबाबत विज्ञानप्रेमींसाठी सविस्तर माहिती उपलब्ध करून देण्यात आली होती. भारतातील सुमारे ६० शास्त्रज्ञांनी गुरुत्वीय लहरींच्या शोधात महत्त्वाचे योगदान दिले. त्यात आयुकातील शास्त्रज्ञांचाही समावेश होता. त्यातीलच संजीव धुरंधर, वरुण भालेराव आदी शास्त्रज्ञांकडून गुरुत्त्वीय लहरींचा शोध कसा लागला, याबाबतची माहिती विद्यार्थी व विज्ञान प्रेमींना जाणून घेता आली. ‘लायगो इंडिया’ प्रकल्पासह गुरुत्वीय लहरींची सविस्तर माहिती देण्यासाठी पोस्टर प्रदर्शन भरविण्यात आले होते. २ आयुकातील मुक्तांगण विज्ञान शोधिका या संस्थेच्या वतीने शाळा व महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना टाकाऊ वस्तूंपासून विविध खेळणी कशा प्रकारे तयार करता येतात, याबाबत मार्गदर्शन केले जाते . ज्योती हिरेमठ, अशोक रुपनेर, मनीष जैन, प्रज्ञा पुजारी, शिवाजी माने हे या संस्थेच्या माध्यमातून रिकामी पाण्याची बाटली, पेन, सायकलची ट्यूब, हिंगाच्या रिकाम्या डब्या आदी वस्तूंच्या आधारे मुलांना खेळणी तयार करण्याचे मार्गदर्शन करतात. विज्ञान दिनाचे औचित्य साधून रविवारी शेकडो विद्यार्थ्यांनी त्यांच्या मार्गदर्शनाचा लाभ घेतला.
गुरुत्वीय लहरींबाबत विद्यार्थ्यांना कुतूहल
By admin | Published: February 29, 2016 1:22 AM