तळेगाव दाभाडे : टेबल फॅन सुरू करीत असताना विजेचा धक्का बसून, एक अकरावर्षीय शाळकरी मुलगी मृत्युमुखी पडली. रविवारी दुपारी राहत्या घरी ही घटना घडली. या संदर्भात डॉ. संतोष जमदाडे यांनी तळेगाव पोलीस ठाण्यात खबर दिली आहे. वैष्णवी विठ्ठल जाधव (वय ११, रा. साईनाथ कॉलनी, तेलीआळी, तळेगाव दाभाडे, ता. मावळ, मूळ रा. सोलापूर) असे मृत मुलीचे नाव आहे. जाधव कुटुंबीय मूळचे सोलापूरचे. वैष्णवीचे चुलते विजय जाधव हे येथील स्वामी विवेकानंद इंग्लिश स्कूलमध्ये शिक्षक आहेत. मुलीचे वडील गावी असतात. दुपारी वैष्णवी घरात एकटीच होती. आई सकाळी नेहमीप्रमाणे कामाला गेली होती. मोठा सहावीत शिकत असलेला भाऊ बाहेर खेळण्यासाठी गेला होता. दुपारी वैष्णवीने घरात पाणी भरले. नंतर फरशी धुतली. त्यानंतर टेबल फॅनचे बटन सुरू करत असताना तिला जोरात शॉक बसला. वैष्णवी ही रामभाऊ परुळेकर विद्या निकेतनमध्ये पाचवीच्या वर्गात शिकत होती. शाळेत ती हुशार व सर्वांची आवडती मुलगी होती. वैष्णवीच्या दुर्दैवी मृत्यूमुळे साईनाथ कॉलनीत शोककळा पसरली. सहायक फौजदार संतोष इंगवले तपास करीत आहेत.(वार्ताहर)
विजेच्या धक्क्याने विद्यार्थिनीचा मृत्यू
By admin | Published: March 07, 2016 1:11 AM