पुणे : कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेऊन ही विद्यार्थी महाविद्यालयाकडे वळण्याऐवजी खासगी क्लासकडे वळतात आणि परिणामी महाविद्यालये ओस पडली आहेत. त्यामुळे शिक्षण विभागाने यावरच उपाय करणारा आदेश काढला आहे. कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये वर्गात मुले येत नसतील, तर त्या महाविद्यालयांना शिक्षक भरतीसाठी ना-हरकत प्रमाणपत्र देण्यात येऊ नये, असा आदेश विभागाने काढला आहे. यामुळे आता मुलांना वर्गाकडे आकर्षित करण्यासाठी महाविद्यालयीन प्रशासनाला कामाला लागावे लागणार आहे.महाविद्यालयांमध्ये अकरावी, बारावीच्या एकएका वर्गातील विद्यार्थिसंख्या मोठी आहे. मात्र, विद्यार्थी महाविद्यालयात येऊन शिकण्यापेक्षा खासगी क्लासकडे वळतात. त्यामुळे महाविद्यालयांमध्ये प्रत्यक्ष शिकणारी विद्यार्थिसंख्या ही कमी असल्याची तक्रार सातत्याने विविध घटकांकडून करण्यात येत होती. एकीकडे विद्यार्थीच नाहीत, तर त्याच वेळी शिक्षकपदांसाठी महाविद्यालयांकडून मंजुरी मागविण्यात येते. विद्यार्थी महाविद्यालयात नसतील, तर शिक्षक तरी काय काम करणार, असा प्रश्न शिक्षण विभागाने उपस्थित केला आहे. त्यामुळे ज्या महाविद्यालयात विद्यार्थी वर्गात बसत नाहीत. त्या महाविद्यालयांची पटसंख्या कितीही असली, तरी नव्याने शिक्षकपदे मंजूर करूच नये, असे परिपत्रक पुणे विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयाने काढले आहे. या परिपत्रकात शिक्षण आयुक्तांनी सूचना दिल्याचा संदर्भ देण्यात आला आहे.
विद्यार्थी नाहीत, तर शिक्षकभरतीही नको
By admin | Published: January 07, 2016 1:42 AM