पुणे : केवळ भारताबाहेरच नोकरीच्या चांगल्या संधी आहेत असे नाही. या नोकऱ्या अत्याधुनिक, चकचकीत तसेच जास्त पैसे देणाऱ्या असल्या तरी त्या माध्यमातून दिमाखदार कारकून किंवा सायबर कुली (हमाल) बनू नका असे आवाहन भारताचे परराष्ट्र सचिव ज्ञानेश्वर मुळे यांनी शुक्रवारी केले. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा ११३ पदवी प्रदान सोहळयातील दिक्षांत भाषण त्यांनी केले. यावेळी कुलगुरू डॉ. नितीन करमळकर, प्र-कुलगुरू डॉ. एन. एस. उमराणी, प्रभारी कुलसचिव डॉ. अरविंद शाळीग्राम यांच्यासह व्यवस्थापन परिषदेचे सदस्य होते.विद्यार्थ्यांना एकमेव्दितीय बना, जिज्ञासा बाळगा, बदलासाठी तयार रहा, नेतृत्त्व क्षमता बाळगा व दयाळूपणा अंगी रुजवा या पंचसुत्रीच्या आधारे ज्ञानेश्वर मुळे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. ते म्हणाले, ‘‘विद्यार्थ्यांनी वेगळया पध्दतीने विचार केला तर त्यांना बाहेरच्या जगात लाखो संधी दिसतील. पुणे शहराचे उदाहरण घेऊन विचार केला तरी खूप काही करता येण्यासारखे आहे. शहराची जीवनवाहिनी असलेल्या मुळा-मुठा नद्यांना त्यांचे पूर्वीचे सौंदर्य प्राप्त करून देण्यासाठी काय करता येईल. शहरात मुबलक प्रमाणात उपलब्ध असलेल्या कुशल मनुष्यबळासाठी स्थानिक पातळीवर रोजगार कसा उपलब्ध करता येईल. शहराला सर्वात स्वच्छ शहर कसे बनविता येईल. शहराची वाहतूक समस्या कशी सोडवता येईल. वाढत्या लोकसंख्येला पुरेशा सोयी सुविधा कशा पुरविता येईल अशा असंख्य प्रश्नांचा अभ्यास करूनन त्याची उत्तरे शोधता येतील.’’उच्च शिक्षण घेतल्यानंतर चांगल्या आयुष्याच्या शोधात परदेशी जाणारे विद्यार्थी आपल्या देशाचा सहजपणे कायापालट करता येऊ शकेल या पर्यायांवर विचार करत नाही. देशात सर्जनशीलता, सकारात्मकता आणि परिवर्तनासाठी अनुकूल वातावरण तयार करून आपल्या देशातील बुध्दिमान युवकांनी परदेशात न जाता भारतात राहावे यासाठी प्रयत्न होणे आवश्यक आहे, असे मुळे यांनी सांगितले. सध्या आपण ज्या जगात राहत आहोत तिथे काहीच कायमस्वरूपी काहीच उरलेले नाही. तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे सगळीकडे झगमगाट निर्माण झाला आहे. गतिशीलता आणि कनेक्टीव्हीटीचा आपल्या जगण्यावर खोलवर परिणाम झाला आहे. डॉ. करमळकर यांनी गेल्या ६ महिन्यात विद्यापीठात राबविण्यात आलेले नाविन्यपूर्ण उपक्रम व अन्य गोष्टींचा आढावा आपल्या भाषणामधून घेतला.
विद्यार्थ्यांनो नुसते सायबर हमाल होऊन कार्यरत राहू नका : ज्ञानेश्वर मुळे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 02, 2018 2:41 PM
सर्जनशीलता, सकारात्मकता आणि परिवर्तनासाठी अनुकूल वातावरण तयार करून आपल्या देशातील बुध्दिमान युवकांनी परदेशात न जाता भारतात राहावे यासाठी प्रयत्न होणे आवश्यक आहे.
ठळक मुद्देविद्यार्थ्यांनी चौकटीच्या बाहेरचा विचार केला तर त्यांना बाहेरच्या जगात लाखो संधीगतिशीलता आणि कनेक्टीव्हीटीचा आपल्या जगण्यावर खोलवर परिणाम