पुणे : एमआयटी अभियांत्रिकी महाविद्यालयातील प्राध्यापकाकडून एका विद्यार्थ्याला प्रॅक्टिकल परीक्षेत तीन वेळा जाणूनबुजून नापास केल्याची माहिती समोर आली असून, विद्यापीठाने महाविद्यालयाला याबाबत चौकशी करण्याच्या सूचना दिल्या आहेत. विद्यार्थ्यांना एमआयटीमधील प्राध्यापकांकडून दिल्या जाणाऱ्या त्रासाच्या विरोधात येत्या मंगळवारी (दि.१२) अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतर्फे (अभाविप) आंदोलन केले जाणार आहे.एमआयटीतील अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थी शुभम शेटे या विद्यार्थ्याने प्राध्यापकांकडून योग्य पद्धतीने शिकविले जात नाही, अशी तक्रार महाविद्यालय प्रशासनाकडे केली होती. मात्र, त्याचा राग मनात धरून संबंधित शिक्षकाने शुभमला प्रॅक्टिकल परीक्षेत तीन वेळा नापास केले. शुभमने याबाबत महाविद्यालयाकडे तक्रार दिली होती. मात्र, तक्रारीची दखल न घेतल्याने त्याने विद्यापीठात तक्रार केली. त्यावर विद्यापीठाने महाविद्यालयाने या प्रकरणाची चौकशी करावी, असे आदेश दिले आहेत. शुभमला लेखी परीक्षेत ७५ टक्के गुण आहेत. परंतु, प्रॅक्टिकल परीक्षेत तो सातत्याने नापास होत आहे. त्यामुळे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने याबाबत महाविद्यालयाच्या व्यवस्थापनाकडे विचारणा केली. मात्र, महाविद्यालयाकडून प्रतिसाद मिळत नसल्याने अभाविपने आंदोलन करण्याचा निर्णय घेतला, असे अभाविपचे राम सातपुते यांनी सांगितले.(प्रतिनिधी)
प्रॅक्टिकल परीक्षेत विद्यार्थी नापास
By admin | Published: July 12, 2016 2:04 AM