पुणे : फर्ग्युसन महाविद्यालयाच्या वसतीगृहात राहणाऱ्या 15 ते 20 विद्यार्थ्यांना डेंग्युची लागण झाल्याचा धक्कादायक प्रकार समाेर आला आहे. वसतीगृहाच्या आजूबाजूला माेठ्याप्रमाणावर गवत वाढले आहे. तसेच गेल्या काही दिवसांमध्ये पुण्यात पडलेल्या पावसामुळे या गवतामध्ये पाणी साचून डेंग्युच्या डासांची उत्पत्ती झाली आहे. वारंवार प्रशासनाकडे तक्रार करुन सुद्धा त्याकडे दुर्लक्ष केल्याचा आराेप विद्यार्थ्यांनी केला आहे.
फर्ग्युसन महाविद्यालयाच्या वसतीगृहाच्या आजुबाजूला माेठ्याप्रमाणावर गवत वाढले आहे. गेल्या काही दिवसांपासून पुण्यात मुसळधार पाऊस देखील झाला. त्यामुळे या गवतामध्ये माेठ्याप्रमाणावर डेंग्युच्या डासांची उत्पत्ती झाली. डासांचा प्रादुर्भाव वाढल्याने विद्यार्थ्यांनी वसतीगृह प्रशासनाकडे वेळाेवेळी तक्रार केली. परंतु तक्रारीकडे दुर्लक्ष केल्याचे विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे. गेल्या काही दिवसांपासून वसतीगृहातील अनेक विद्यार्थी आजारी पडले असून त्यांच्यातील 15 ते 20 विद्यार्थ्यांना डेंग्युची लागण झाली आहे. सध्या विद्यार्थी डेंग्युवर उपचार घेत आहेत. वसतीगृह प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने अखेर विद्यार्थ्यांनी प्राचार्यांकडे याबाबत लेखी तक्रार केली.
याबाबत बाेलताना सुनील जाधव हा विद्यार्थी म्हणाला, वसतीगृहाच्या सभाेवताली माेठ्याप्रमाणावर गवत वाढले आहे. त्यामुळे डासांची उत्पत्ती झाली. याबाबत चार ते पाच वेळा वसतीगृह प्रशासनाकडे तक्रार केली. परंतु प्रशासनाने दुर्लक्ष केले. आता 15 ते 20 मुलांना डेंग्युची लागण झाली आहे. या विद्यार्थ्यांच्या उपचाराचा खर्च देखील महाविद्यालयाने केला नाही. वसतीगृहात कुठेही प्रशमाेपचार पेटी नाही. विद्यार्थ्यांच्या आराेग्याबाबात महाविद्यालयाने दुर्लक्ष केले आहे.
दरम्यान महाविद्यालयाच्या विद्यार्थींनींसाठी असणाऱ्या एलआर रुममध्ये देखील वारंवार चाेरीच्या घटना घडत आहेत. त्याबाबत विद्यार्थीनींनी तक्रार देखील केली हाेती.
या सगळ्याबाबत डेक्कन एज्युकेशन साेसायटीच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष शरद कुंटे म्हणाले, पाऊस पडल्याने वसतीगृहाच्या आजूबाजूला माेठ्याप्रमाणावर गवत वाढले आहे. तसेच चिखलही झाला आहे. गेला महिनाभर शहरात पाऊस झाल्याने गवत कापणे शक्य झाले नाही. पावसामुळे गवत कापण्याची मशीन घेऊन तिथे जाणे शक्य नव्हते. परंतु आता गवत काढण्याचे काम हाती घेत असून वसतीगृहात आणि आजूबाजूला स्वच्छःता राखण्याच्या सुचना संबंधितांना देण्यात आल्या आहेत. तसेच विद्यार्थीनींच्या एलआरमधून हाेणाऱ्या चाेऱ्या राेखण्यासाठी लवकरच त्या परीसरात सीसीटिव्ही कॅमेरे लावण्यात येणार आहेत.