तन्मय ठोंबरे/रोहित शुक्ल
पुणे : विद्याव्हॅलीतील दोन विद्यार्थ्यांची ॲथलेटिक्स स्पर्धेत भारताचे नेतृत्व करण्यासाठी फ्रान्सला होणाऱ्या स्पर्धेसाठी निवड झाली आहे. अकरावीतील आदित्य हरी (वय १७) आणि बारावीतील आर्यन कदम (वय १८), अशी त्यांची नावे आहेत.
प्रशिक्षक अजय देठे यांनी प्रशिक्षण दिले. गेल्या तीन वर्षांपासून शाळेच्या वतीने जमैकन प्रशिक्षण जर्मायन शँड हे त्यांचा सराव करून घेत आहेत. प्राचार्य नलिनी सेनगुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली हे यश त्यांना मिळाले आहे. आदित्य आणि आर्यन ‘लोकमत’शी बोलताना म्हणाले, आमची शाळा आणि प्रशिक्षकांचा आमच्यावर पूर्ण विश्वास होता. सराव सामन्यांमध्ये आमची कामगिरी चांगली होती.
ॲथलेटिक्सकडे वळण्याचे कारण सांगताना आदित्य म्हणाला, पहिलीत असताना क्रीडादिनी मी धावलो. त्याच वेळी अजय देठे सरांनी माझ्यातील क्षमता पाहिली. आईला सांगून मला ॲथलेटिक्सच्या प्रशिक्षणासाठी प्रवेश घ्यायला सांगितले. आदित्यची आई अंजली राजू म्हणतात, पालक म्हणून ही खूप अभिमानाची भावना आहे.
आर्यन म्हणाला, क्रीडा दिनाच्या स्पर्धेत मी धावण्याच्या स्पर्धेत अंतिम फेरीत पोहोचलो होतो. त्याचवेळी ठरविले की, माझी आवड हीच आहे. त्याचप्रमाणे माझ्या यशात पालकांचे खूपच मोठे योगदान आहे.
आर्यनची आई मोहना कदम म्हणाल्या, आमच्यासाठी एक स्वप्न सत्यात उतरले आहे. यासाठी शाळेचे आभार मानायला हवेत. त्यांच्या प्रयत्न आणि पाठिंब्यामुळेच हे शक्य झाले आहे.
अजय देठे म्हणाले, दोघांकडून अपेक्षा होतीच. मात्र, लॉकडाऊनमुळे स्पर्धा होत नव्हत्या. ते आणखी उत्कृष्ट कामगिरी करतील आणि देशाला अभिमान वाटेल, अशी कामगिरी करतील.
''विद्याव्हॅली शाळा सुरू करतानाच आमचा विचार होता की, अभ्यासाबरोबरच विद्यार्थ्यांमध्ये क्षमताही निर्माण व्हायला हव्यात. प्रत्येकाने तंदुरुस्त राहायला हवे. त्यासाठी शाळा सातत्याने उपक्रम राबवीत असते. विद्यार्थ्यांना अगदी आंतरराष्ट्रीय पातळीवरचे प्रशिक्षण मिळावे यासाठी आमचे प्रयत्न असल्याचे विद्याव्हॅली स्कूलच्या प्राचार्या नलिनी सेनगुप्ता यांनी सांगितले.''