पुणे : शैक्षणिक सवलतींसाठी अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना दहावी आणि बारावी नंतरच्या पदविका-पदवी आणि इतर अभ्यासक्रमाकरिता प्रवेश घेताना अनुसूचित जमाती वैधता प्रमाणपत्रची आवश्यकता असते. विद्यार्थ्यांना हे प्रमाणपत्र मिळविणे सोयीचे जावे यासाठी आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्थेतर्फे विशेष आॅनलाईन मोहीम राबविण्यात येत आहे. त्यामाध्यमातून अर्ज केल्यास विद्यार्थ्यांची प्रमाणपत्र प्रक्रिया अधिक जलद होणार आहे. नुकताच इयत्ता दहावी आणी बारावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून, विद्यार्थ्यांची विविध अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी धावाधाव सुरु आहे. त्या पार्श्वभूमीवर आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्थेच्या अंतर्गत पुणे, नाशिक, नागपूर, ठाणे, औरंगाबाद, अमरावती, नंदूरबार व गडचिरोली अनुसूचित जमाती प्रमाणपत्र समित्यांकडे मोठ्या प्रमाणावर अर्ज येत आहेत. विद्यार्थ्यांच्या अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र त्वरित मिळावे यासाठी विद्यार्थ्यांनी ई-ट्राईब व्हॅलिडीटी डॉट महाआॅनलाईन या संकेतस्थळावर अर्ज करावा. त्यानंतर त्यांना प्राधान्याने वैधता प्रमाणपत्र देण्याची प्रक्रिया सुरू करण्यात येईल. यासंदर्भात संबंधित समितीच्या पोलीस दक्षता पथकाला शालेय चौकशीची व कागदपत्रांची पडताळणी करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहे. आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था, पुणे येथे ०२०-२६३६०९४१ हेल्पलाईन सुरू करण्यात आली असून त्यावर सकाळी ९ ते सायंकाळी ७ या वेळेत विद्यार्थ्यांना संपर्क साधता येईल.सर्व आठही अनुसूचित जमाती प्रमाणपत्र पडताळणी समित्यांमध्ये अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांसाठी विशेष कक्षामार्फत आवश्यक ती माहिती पुरविण्याची व्यवस्था करण्यात येत आहे. तसेच सदर मोहिमेच्या कामकाजाचा वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून दैनंदिन आढावा घेतला जाणार असल्याचे सांगण्यात आले. पुणे समितीसाठी पुणे, सांगली, सातारा, सोलापूर व कोल्हापूर येथील विद्यार्थी क्विन्स गार्डन येथील संस्थेच्या कार्यालयाशी संपर्क साधावा असे आवाहन आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्थेतर्फे करण्यात आले आहे.
अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना मिळणार आॅनलाईन प्रमाणपत्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2018 8:18 PM
विद्यार्थ्यांच्या अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र त्वरित मिळावे यासाठी विद्यार्थ्यांनी ई-ट्राईब व्हॅलिडीटी डॉट महाआॅनलाईन या संकेतस्थळावर अर्ज करावा.
ठळक मुद्देआदिवासी संशोधन संस्था : विशेष हेल्पलाईन कक्ष स्थापनअनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांसाठी विशेष कक्षामार्फत आवश्यक ती माहिती पुरविण्याची व्यवस्था