पुणे : फिल्म इन्स्टिट्यूटच्या आंदोलनाकडे केंद्र सरकार दुर्लक्ष करीत असल्याने आंदोलक विद्यार्थी पावसाळी अधिवेशनाचे निमित्त साधून दिल्ली येथे ३ आॅगस्ट रोजी निदर्शने करणार असल्याची माहिती स्टुडंट असोसिएशनचे प्रमुख राकेश शुक्ला, विकास अर्स यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली.‘एफटीआयआय’च्या नियामक मंडळाचे अध्यक्ष आणि सदस्य यांची नियुक्ती रद्द व्हावी, या मागणीसाठी विद्यार्थ्यांनी ४३ दिवसांपासून सुरू केलेल्या आंदोलनाची केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालयाने दखल घेतलेली नसली, तरीही विद्यार्थ्यांनी जिद्द सोडलेली नाही. व्याख्याने, नाट्य, संगीत या माध्यमातून शांततापूर्ण मार्गाने त्यांचे आंदोलन सुरू आहे. विद्यार्थ्यांच्या लढ्याला विविध स्तरांतून पाठिंबा मिळत असल्याने ही एक राष्ट्रीय चळवळ बनली आहे. माजी संचालक डी. जे. नारायण यांनीही वर्ग सुरू करा व आंदोलन मागे घ्या, अशी इशारावजा नोटीस दिली असतानाही विद्यार्थ्यांनी त्याला केराची टोपली दाखवली. विद्यार्थी एक पाऊल मागे टाकण्यास तयार नसल्याने केंद्रानेही त्यांच्याशी संवादाची दालने बंद केली आहेत. केंद्राकडून त्यांच्यावर कारवाई करण्याचे संकेतही देण्यात आल्याचे समजते. त्यामुळे आता या आंदोलनाकडे लक्ष वेधण्यासाठी विद्यार्थ्यांनी ‘चलो दिल्ली’चा नारा दिला आहे. फिल्म इन्स्टिट्यूटमधून अनेक विद्यार्थी दिल्ली येथे रवाना होणार असून, त्याच दिवशी पुण्यातदेखील निदर्शने करण्यात येणार आहेत. (प्रतिनिधी)
विद्यार्थ्यांनी दिला ‘चलो दिल्ली’चा नारा
By admin | Published: July 23, 2015 4:20 AM